गडचांदूर: कोरपना तालुक्यातील बिबी येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ. गिरीधर काळे यांच्या वाढदिवसानिमित्त १ जून रोजी कवठाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील ५९ युवकांनी रक्तदान करून समाजसेवक डॉ. काळे यांच्या लोकसेवेला सलाम केला. यावेळी नुकतीच नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या गिरीश उर्फ प्रतिक बोरडे यांचा सत्कार करण्यात आला. तालुका आरोग्य विभाग व डॉ. काळे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले होते.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार ॲड. वामनराव चटप, उद्घाटक म्हणुन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, सत्कारमूर्ती डॉ. गिरिधर काळे व सौ. सविताताई काळे यांची उपस्थिती होती. विशेष अतिथी म्हणून पंचायत समितीचे माजी उपसभापती मदन सातपुते, वैद्यकीय अधिकारी डॉ. बावणे, डॉ. रवींद्र हेपट, डॉ. अरविंद ठाकरे, पुरुषोत्तम निब्रड, अविनाश पोईनकर, शैलेश विरुटकर आदी उपस्थित होते.
समाजसेवक डॉ. काळे मागील ३७ वर्षापासून मानवी शरिरातील तुटलेल्या, लचकलेल्या अस्थिरुग्णांवर निःशुल्क सेवा करत आहे. पाच लाखाहून अधिक रुग्णांवर त्यांनी उपचार करून बरे केले आहे. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून गेल्या ५ वर्षापासून वाढदिवसानिमित्त रक्तदान करण्यात येते.
प्रास्ताविक आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांनी तर संचालन दीपक चटप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरपंच नरेश सातपुते, निशिकांत डोहे, देवेंद्र हेपट, दालमिया भारत फाऊंडेशनचे लक्ष्मण कुळमेथे, द्वारकेश ठाकरे, आशा वर्कर्स आदींनी सहकार्य केले.