गडचिरोली:-महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व पारदर्शक करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव संकल्पने अंतर्गत महाराजस्व अभियान-विशेष शिबीर घेण्याचा शासनाचा हा महत्वाचा निर्णय आहे. ग्रामीण भागातील गरजू व वंचित असणाऱ्या पात्र नागरिकांना याचा पुरेपूर लाभ मिळणार असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजाने पुढे यावे असे आवाहन माजी जि प अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.
मुलचेरा महसूल प्रशासनातर्फे तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुखडी टोला येथे दुसरे महाराजस्व अभियान घेण्यात आले. याप्रसंगी उदघाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.अभियानाचे अध्यक्ष म्हणून चामोर्शी चे उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम उपस्थित होते. तर,प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,जि प सदस्य रवींद्र शहा, माजी प स सभापती सुवर्णा येमुलवार, तहसीलदार कपिल हटकर, संवर्ग विकास अधिकारी मनोहर रामटेके,नायब तहसीलदार राजेंद्र तलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी अभियानाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांनी आझादी का अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या राजस्व अभियानाबाबत मार्गदर्शन केले.शासन प्रत्येक वेळी आपल्या घरापर्यंत येऊ शकत नाही आणि गोरगरीब नागरिकांनाही प्रत्येक वेळी कार्यालयात येऊन आपली कामे करून घेणे शक्य नसल्याने या अडचणी दूर करण्यासाठी एकाच मंचावर सर्व योजनांचा लाभ मिळावा आणि सर्व प्रकारचे विविध दाखले लाभार्थ्यांना मिळावे यासाठी तालुक्यात 5 ठिकाणी अभियान घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यानिमित्ताने दिली.
अभियानाचे प्रास्ताविक करताना तहसीलदार कपिल हटकर यांनी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.त्यात संजय गांधी निराधार योजना,सेतू शाखा,रोजगार हमी योजना,सातबारा संगणकीकरण,एकल ग्रामसभा सेंटर,आधार केंद्र व नैसर्गिक आपत्ती विषयी माहिती दिली.तर,संवर्ग विकास अधिकारी मनोहर रामटेके यांनी पंचायत विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देतानाच पुरेपूर लाभ घेण्याचे सुद्धा आवाहन त्यांनी केले.तर भविष्यात नियोजन केलेल्या योजनांची माहिती सुद्धा त्यांनी दिली.
महाराजस्व अभियानासाठी आलेल्या मान्यवरांचे गावकऱ्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात जंगी स्वागत केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महसूल विभागाचे कर्मचारी आणि ग्रामपंचायत गोमणी चे सचिव एस एम मराठे तसेच गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोमणीचे तलाठी रितेश चिंदमवार यांनी केले.
450 जात प्रमानपत्रांचे वाटप
मुखडी टोला येथील महाराजस्व अभियानात 450 जातीचे प्रमाणपत्र,37 रेशनकार्ड,13 संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र,580 हयात प्रमाणपत्र व शेतकरी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत समीर तारापद मंडल यांना धनादेश देऊन ट्रॅक्टर ची चावी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.