निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडणार.
खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाल्याने सदर शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.उपलब्ध असणारे पाण्याचे साधन वापरून त्यांनी उन्हाळी हंगामामध्ये धानाची लागवड केली आहे.त्यानुसार उन्हाळी हंगामामध्ये धानाचे उत्पादन लक्षणीय होण्याची शक्यता आहे.हे धान विकुन खरीप हंगामात झालेले नुकसान भरून निघेल अशी आशा या शेतकऱ्यांना आहे.परंतु यावर्षिचे मार्केटिंग फेडरेशन द्वारे निश्चित करण्यात आलेले धान खरेदीचे उद्दिष्ट अत्यल्प आहे.त्यामुळे सदर धान उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता मार्केटिंग फेडरेशन च्या माध्यमातून उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे, अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात दिनांक ३० मे २०२२ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा केली असता ना. भुजबळ यांनी उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उदि्दष्ट वाढविण्यात येत असून लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी धान उत्पादक शेतक-यांना आवाहन केले आहे की, उदि्दष्ट वाढविण्यासंदर्भात शासनाचा निर्णय होईपर्यंत कोणीही धान विक्रीस नेऊ नये. हा निर्णय घेण्यास आपण शासनाला भाग पाडू असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.