गडचिरोली:-महाराष्ट्र आणि तेलंगाणा या दोन राज्यांना जोडणाऱ्या आणि तेलंगाणा सरकारने दोन वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या अहेरी तालुकालगत प्राणहिता नदीवरील पुलाची अज्ञातांनी 15 मे रोजी रात्रीच्या सुमारास तोडफोड केल्याची घटना 16 मे रोजी उघडकीस आली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात आणि हालेवारा पोलीस मदत केंद्र अंतर्गत समाविष्ट मवेली येथे नक्षल्यांनी चार वाहनांची जाळपोळ केल्याची घटना सुद्धा 16 मे रोजी उघडकीस आली.सदर रस्त्याचे काम आंध्रप्रदेश राज्यातील वल्लभनेनी कस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आहे आणि प्राणहिता नदीवरील पुलाचे बांधकाम सुद्धा याच कंपनीने केले असल्याने आता चर्चेला उधाण आला आहे.
सदर पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षे लोटून गेली.रहदारीही सुरळीत सुरू आहे. मात्र,अजूनही तेलंगाणा सरकार कडून लोकार्पण करण्यात आले नाही.लोकार्पण साठी तेलंगाणा राज्यात पुलाच्या सुरुवातीलाच सिमेंटचे नामकरण फलक लावले होते.लोकार्पण न झाल्याने त्यावर काही लिहिले नव्हते.मात्र,अज्ञातांनी लोकार्पण फलकासह पुलाच्या साईडवालची तोडफोड केली. तेलंगाणा राज्याच्या हद्दीत ही तोडफोड झाली आहे. एकाच रात्री विविध ठिकाणी एकाच कंपनीच्या कामावर घटना घडल्याने परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.या घटनेनंतर सदर कंपनीतर्फे घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.
पहिल्यांदाच आंतरराज्यीय पुलाचे तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला आहे.या पुलावर दिवसभर आणि रात्री जवळपास 9 वाजेपर्यंत नागरिकांची वर्दळ असते त्यामुळे मध्यरात्री तोडफोड केले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे.नेमकं हे कृत्य कुणी केले हे अद्यापही कळले नसले तरी,अहेरी उपविभागात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
जिल्ह्यातील अहेरी तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या प्राणहिता नदीवरील वांगेपल्ली घाटावर तेलंगाना सरकारने केवळ दोन वर्षात कोट्यावधी रुपयांची निधी खर्च करून पुलाचे बांधकाम पूर्ण केले. या पुलामुळे दक्षिण गडचिरोली भागातील नागरिकांना तेलंगाणामध्ये आंतरराज्यीय वाहतूक करणे अतिशय सुलभ झाले आहे.