सह्याद्रीच्या पारावरून(ॲड. जयंत साळवे) :– विजय शोभा निळकंठ वाटेकर या नावाशी मी पूर्वी परिचित नव्हतो . पण साधारणतः सप्टेंबर २०२१ मध्ये मला माझे कवीमित्र किशोर कवठे राजुरा येथे प्रतिभावंतांच्या कविसंमेलनात प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते. तेव्हा त्या कार्यक्रमात माझी कवी विजय वाटेकरांशी ओळख झाली .
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1935924116579452&id=100004856472902
तसे पाहिले तर कविता करणे हा माझा प्रांत नाही . मला कविता करणे वगैरे जमत नाही . कारण मी गद्य माणूस आहे . पण हे असे असले तरी मला चांगल्या कवितांचे वाचन करणे आवडते . तर या कार्यक्रमातच कवी विजय वाटेकर यांनी त्यांचा पहिला कवितासंग्रह ” पुढील तपास सुरू आहे ” मला वाचायला दिला . या कवितासंग्रहाचे शीर्षक वाचून मला असे वाटले होते की कवी विजय वाटेकर हे कदाचित पोलिस खात्यात नोकरी करणारे असावेत . परंतु ते शिक्षक आहेत असे मला नंतर कळले . मग त्यांनी कवितासंग्रह दिल्यावर काही दिवस दुसऱ्या पुस्तकांचे वाचन चालू असल्यामुळे त्यांचा तपासाचा कवितासंग्रह मी कपाटात ठेवून दिला होता .
मग असेच एक दिवस कपाटातली पुस्तके पाहत असताना विजय वाटेकरांचा हा कवितासंग्रह हातात घेतला . म्हटले की कशाचा तपास कवींनी सुरू ठेवला आहे हे वाचून पाहूया . मग जेव्हा त्यांची या कविता लिखाणामागची भूमिका वाचली तेव्हा मी उडालोच . माझ्या मनाने सांगितलं की या माणसाशी आपली आता चांगली मैत्री होणार. मग एक एक कविता वाचायला सुरुवात केली तसा तसा मी आतून अस्वस्थ होत गेलो . या कवितालिखाणा मागची भूमिका सांगताना ते म्हणतात , ” माणसात देव शोधणारी आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागायला सांगणारी आपली संस्कृती . या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिस्थिती बदलेल
अशी आशा होती . पण खेदाची गोष्ट म्हणजे परिस्थिती आणखीनच चिघळत चालली आहे . देवाच्या , धर्माच्या ,जातीच्या ,पंथाच्या ,
भाषेच्या , वृथा राष्ट्रवादाच्या नावाखाली शेकडो निरपराध नागरिकांचा बळी घेतला जातो आहे . हे पूर्वीपासून घडत आलेलं आहे . फक्त आता त्याची तीव्रता आणि परिणामकारकता वाढली असं दिसते . समतेच्या नावाखाली विषमता , न्यायाच्या नावाखाली अन्याय . आज आपले स्वातंत्र्य पाऊण शतकाकडे वाटचाल करीत आहे, तरी सामान्य माणूस अन्न , पाणी ,आरोग्य , निवारा , वीज , शिक्षण , रोजगार या मूलभूत प्रश्नांवर संघर्ष करतो आहे , हे स्वातंत्र्याचे फेल्युअर आहे . अशामुळे सामान्य माणूस भ्रमित झाला असला तरी लेखक ,कवी , कलाकार हा कधीच भ्रमित नसतो . याचे कारण त्याला माणूस वाचता येतो . आणि म्हणून ज्या देशातील सामान्य माणसाला स्वातंत्र्याच्या बहात्तर वर्षांनंतरही आपल्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करावा लागत असेल तर , तर ते स्वातंत्र्य स्वातंत्र्य नसून स्वातंत्र्याचं विडंबन आहे . या विडंबनाविरूध्द आवाज उठविणे माझे नैतिक कर्तव्य आहे . ”
विजय वाटेकर यांच्या कविता लिखाणामागची भूमिका कोणत्याही विचारी आणि विवेकी माणसाला पटावी अशीच आहे . या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा त्यांची कविता वाचायला सुरुवात करतो तेव्हा वाचकाला हळूहळू याची प्रचीती येते . वाटेकरांनी आपल्या कवितेत नवा विचार मांडला आहे . म्हणून ‘ सभ्यता ‘ या कवितेत ते म्हणतात ,
तुम्ही देव मांडलेत
मी विचार मांडला
तुम्ही नरक दाखविला
मी नीती दाखवली
तुम्ही जात शोधली
मी माणूस शोधला
तुम्ही श्रद्धा वाढविली
मी तर्क वाढविला
तुम्ही रुढी पोसल्या
मी विवेक जोपासलमाझी सभ्यता मी विकसित केली तुमचं काय ते तुम्ही ठरवा .
आज देशात खरं म्हणजे नव्या पिढीला स्वातंत्र्य ,समता ,बंधुत्व या मूल्यांचं शिक्षण देण्याची गरज आहे . पण दुर्दैवाने चित्र उलटं दिसत आहे . परिस्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे . काही अदृश्य शक्ती संपूर्ण पिढी गारद करायला निघाली आहे . म्हणून कवीला वाटते की या वाईट विचारांच्या बेड्या तुटल्या पाहिजे . या आर्ततेतून ते ‘ बेड्या ‘ या कवितेत म्हणतात ,
सत्ता कशाचीही असू शकते उपकाराची , प्रसिद्धीची , मोठेपणाची , श्रीमंतीची , अधिकाराची , घमेंडीची , बहुमतातील मान्यतांची ,
सत्तेची , श्रद्धेची ,
तेव्हा सर , या अदृश्य बेड्या तोडून
मुलांना स्वातंत्र्य शिकवत चला फार गोड मुलं आहेत हो ही !
दिवसेंदिवस माणूस फारच संवेदनहीन होत चालला आहे . या पार्श्वभूमीवर ‘ फॅशन होत चाललीय संवेदना ‘ या कवितेत कवी म्हणतो ,
फॅशन होत चाललीय
आपली संवेदना
वृद्धाश्रमात साजऱ्या केलेल्या वाढदिवसाचं किती कौतुक होतंय येते पेपरात बातमी
डायरेक्ट फोटोसह
एक दिवस झाड लावून
बोलतो पर्यावरणावर उजागरीनं आपण खूपच हळवे ,
संवेदनशील व जबाबदार नागरिक असतो अशावेळेस
माये ! हे बरंय
तू फॅशनेबल नाही
अन् मी पण. . .
आजकाल आपण पाहतो की बरेचसे तथाकथित समाजसेवक फोटो पुरती समाजसेवा करून त्याचं जाहीर प्रदर्शन करत असतात त्यांचा राजकिय स्वार्थ साधण्यासाठी . अशा लोकांसाठी ही कविता म्हणजे चाबकाचा फटका आहे .
काही लेखक आणि कवी देखील आपापल्या जातींच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत हे सांगणारी कविता या संग्रहात आहे . कविच्याच मते कवी , लेखक , कलाकार यांचं काम आहे समतेचं नांगर धरून विषमतेचं तण काढणं . कारण मानवता हाच त्यांचा धर्म असतो .
अशा कवी लेखकांच्या ढोंगीपणा वर प्रहार करताना ‘कविसंमेलन’ या कवितेत कवी म्हणतात ,
क्षत्रियांनी क्षत्रियांची
कविता सादर केली
ब्राह्मणांनी ब्राह्मणांची
दलितांनी दलितांची
एकंदरीत सर्वांनीच सादर केल्या आपापल्या दमदार कविता टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटासह माणसाची कविता
तूही विसरलास
अन् मीही
.
आजची वर्तमान परिस्थिती दिवसेंदिवस फार बिघडत चालली आहे . राजकीय पक्षांचे नेते जातीधर्माचे राजकारण करून सामान्य माणसांचे जगणे बिघडवून टाकत आहेत . खरे म्हणजे या देशात राहणारा , या देशावर प्रेम करणारा माणूस मग तो कोणत्याही जातीचा , धर्माचा अथवा पंथाचा असो तो भारतीयच असतो . आणि तसे पाहिले तर सगळ्याच सामान्य माणसांना सर्व जातीधर्माच्या लोकांशी काम असते . सामान्य माणसे आपले दैनंदिन आयुष्य जगताना कोणाच्याही जातीधर्माचा विचार करत नाहीत . पण आज जाती जातीत , धर्मा धर्मामध्ये द्वेष पसरवून काही माणसे या देशाचे वातावरण दूषित करण्यात मश्गूल झाली आहेत . अशावेळी सामान्य माणसांनी जागृत होऊन अशा द्वेष पसरविणाऱ्या माणसांना त्यांची जागा दाखवून देणे अतिशय आवश्यक झाले आहे .
या पार्श्वभूमीवर वाटेकरांची ही कविता म्हणजे वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करणारी आहे .
‘ खरं तर ‘ या कवितेत ते लिहितात ,
काल युसूफ जोगापूरच्या यात्रेत पोट भरून नाचला
सत्यपालनं शिरखुर्मा
भाभीजानला धन्यवाद म्हणत ढेकर देत खाल्ला .
सलीमच्या अपघातात
संज्याचाच झाला ब्लड ग्रुप मॅच शोभा आणि शबाना यांच्या दोस्तीला जग देते दाद
माय पूजते बुवा फरीद
हिंदू मुस्लीम सगळेच त्याचे मुरीद कुठं आहे बे हिंदू मुस्लिम वाद रोज रोज ताटात
तिरस्कार वाढतोस
खरंतर तुलाच
जोड्याने फोडले पाहिजे . . .
हे असं काही वाचलं तर वाचक अंतर्मुख झाल्याशिवाय राहणार नाही . म्हणून एका कवितेत शेवटी कवी म्हणतो ,
तुला शेवटचं सांगतो
ऊठसूट देशप्रेमाच्या फोक्या
मारत नको जाऊस
हा देश माझाही आहे
मी किरायाचा देशप्रेमी नाही . . .
आज आपण पाहतो की जे लोक या जालीम व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविण्याचा प्रयत्न करतात त्यांना एकतर देशद्रोही ठरविल्या जाते किंवा त्यांना आयुष्यातून उठवल्या जाते . याच आशयाची कवितासंग्रहाचे शीर्षक असलेली ‘ पुढील तपास सुरू आहे ‘ ही कविता अतिशय दमदार आहे . कवी लिहितो ,
दाभोलकर ,कलबुर्गी ,
पानसरे, गौरी लंकेश
यांनी उठविला आवाज अन्यायाविरूध्द
त्यांना गोळ्या झाडून
ठार मारण्यात आले
रोहित वेमुलाचही तसंच झालं
तरूणपणीच त्याला
गमवावा लागला आपला लाखमोलाचा जीव
माझं काहीच म्हणणं नाही
तशी माझी हिम्मतही नाही
पुढील तपास सुरू आहे
पण एकच गोष्ट
सारखी बेचैन करते
‘ भारत माझा देश आहे ‘
ही प्रतिज्ञा कशी म्हणू
तेवढं फक्त सांगा . . .
याचं कारण असं आहे की ज्या ” अच्छे दिन ” ची घोषणा करण्यात आली होती ते अच्छे दिन शेवटी आलेच नाहीत . काहीही करून निवडणुका जिंकणे हाच राजकीय पक्षांचा उद्देश राहिला अशी परिस्थिती आज दिसून येत आहे . सामान्य माणसाच्या प्रश्नांची सोडवणूक स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही झालीच नाही . म्हणून ‘ अच्छे दिन ‘ या कवितेत कवी म्हणतो ,
धुव्वाधार भाषणे ,भरगच्च सभा तुफानी दौरे करून
मोठ मोठाले होर्डिंग्ज ,
टीव्ही आणि वर्तमानपत्रातील एक्स्क्लुझिव्ह इंटरव्ह्यू ,
भव्य रोड शो वगैरे आटोपून सतरंज्या उचलणार्या मूर्ख कार्यकर्त्यांना संमोहित करून दलितांच्या घरी जेवणाचा
फार्स करुन
शेतकर्यांविषयी खूपच
आस्था दाखवून
राष्ट्रवादाचे भलतेच सोंग नेसून भीक मागत मागत
शेवटी तो माझ्या दारात आला कधी नव्हे इतक्या
चोपड्या शब्दांत बोलला
मी फक्त इतकेच बोललो
रोजगाराचं काय झालं ?
पिण्याच्या पाण्याचं
कुठपर्यंत आलं ?
शेतकरी आत्महत्या
कधी थांबणार ?
एवढ्यात मी दिसलो तरी तो नमस्कारही करत नाही . . .
या आणि अशा अनेक कवितांनी वाचक अंतर्मुख होऊन विचार करायला प्रवृत्त होतो . या व्यवस्थेसोबत लढताना कवी त्रासून गेला आहे . त्याला या व्यवस्थेमध्ये बदल हवा आहे . म्हणून कवी म्हणतो ,
पेटतो दिवा वात पाहिजे
होतो बदल साथ पाहिजे
मेलो जरी मी एकटाच मित्रा ठिणगी तुझ्याही
उरात पाहिजे . . .
कारण कवीला मानवमुक्तीचं अंतिम जयगीत गायचे आहे. म्हणून कवी म्हणतो ,
मला क्षमा करा !
मी नाही ठेवू शकत
शब्दांना मांडलिक
मान्य नाही मला कुठलाच तह आता गायचंय माझ्या शब्दांना मानवमुक्तीचं अंतीम जयगीत . . .
कारण मानवमुक्तीच्या संघर्षाचा प्रवास संपणारा नाही . तो पुढेही सुरूच राहणार आहे . म्हणून विजय वाटेकरांचा हा कवितासंग्रह प्रत्येकाने अंतर्मुख होऊन वाचलाच पाहिजे असाच लिहिण्यात आला आहे .
ॲड. जयंत साळवे