भद्रावती येथील विविध कार्यकारी संस्था निवडणुकीत पाच जणांचे अर्ज बाद
शेतकरी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी राजकीय लोकप्रतिनिधींच्या दबावात येवून केले बिनबुडाचे आरोप
भद्रावती :
येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. शेतकरी परिवर्तन पॅनल व शेतकरी शेतमजुर सहकार पॅनलचे उमेदवार निवडणूक रिंगणात आमने सामने आहेत. नुकतीच मागील महिन्यात २६ एप्रिलला नामनिर्देशन अर्जाची छाननी पार पडली होती. परंतु छाननीदरम्यान शेतकरी परिवर्तन पॅनलमधील ६ व इतर १ उमेदवारांचे अर्ज कागदोपत्रातील त्रुट्या व अपूर्ण अर्ज यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी रवी मांडळकर यांनी अपात्र ठरविले होते.
याबाबतची तक्रार अपात्र ठरविलेल्या अरविंद मते, नागेश्वर आस्वले, मधुकर सावनकर, रुपेश वासाडे, तानेबाई पायघन या पाच उमेदवारांनी जिल्हा उपनिबंधक व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेली होती. त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५२ (अ) अंतर्गत दाखल अपील अर्जावर ५ मे ला निर्णय आला असून, या अन्वये पाचही उमेदवारांचे अपील अर्ज खारीज करण्यात आले आहेत. अपिलित जाणाऱ्या या उमेदवारांच्या नामांकन पत्रातील अर्जावर कुठे अभिसाक्षी नव्हती तर कुठे सूचकाची सही तर कुठे प्रमाणपत्र ‘क’ वर सही नव्हती. या बाबी शेवटी तक्रारकर्त्यानी सुनावणी दरम्यान स्वीकार केल्या.
यानुसार आता रमेश गोसाई घोरुडे व मनोज पांडुरंग राहुलगडे हे दोन उमेदवार संस्थेच्या व्यवसायाशी समव्यवसायी असल्याने या दोन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आधीच बाद झाल्याने त्या उमेदवारांनी अपील दाखल केली नाही. परिणामी शेतकरी शेतमजुर सहकार पॅनलचे एक उमेदवार निवडुन आले आहेत व उर्वरित शेतकरी परिवर्तन पॅनलचे पाच उमेदवारांचे अपीलीय अर्ज अपीली अधिकारी यांनी फेटाळल्याने शेतकरी शेतमजुर सहकार पॅनलचे एकूण सहा उमेदवार अविरोध निवडून आले आहेत.
शेतकरी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी राजकीय लोकप्रतिनिधींच्या दबावात येवून बिनबुडाचे आरोप केले असल्याचे या निर्णयाने सिध्द झाले. शेतकरी परिवर्तन पॅनलने प्रस्थापित जिल्हा बँकेचे संचालक व पॅनलधारक कुठेतरी आपल्या पदाचा गैरवापर करीत असल्याचा खोटा आरोप केला. यापूर्वी सुध्दा भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कार्यालयामध्ये जाऊन शेतकरी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी लोकप्रतिनिधीसह धिंगाणा घातलेला होता. व्यवस्थापक ठाकरे यांना मारहाण केलेली होती. ही सर्व बाब अत्यंत गंभीर व लोकशाही विरोधी असून शेतकरी परिवर्तन पॅनलचे पितळ या निर्णयाने उघड झाले आहे.
अपीलीय अधिकारी यांचेवर वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा दबाव असातांना सुध्दा अपीलीय अधिकारी दबावाला न जुमानता सदर विषयी पूर्ण चौकशी करुन कायदा व नियमांचे पालन करुन तथा अपीलार्थींचे म्हणने ऐकुन अपील फेटाळली. शेवटी सत्याचा विजय झाला असल्याचे बोलल्या जात आहे.