गडचिरोली:-शासनाने सर्व शासकीय कार्यालयांना कार्यालयीन वेळेचे (ये-जा) असे निश्चित वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र अनेक शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचा-यांकडून याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा प्रकार सुरुच आहे. असाच प्रकार जिल्हा मुख्यालयातील राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता कार्यालयात आज सोमवार, 2 मे रोजी निदर्शनास आला. कार्यालयीन कामकाज सुरु करण्याचा कालावधी लोटूनही सकाळी 11 वाजेपर्यंत सदर कार्यालय कुलूपबंद होते. सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी कार्यालयाला भेट दिली असता शासकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या लेटलतिफीचा हा प्रकार उघडकीस आला.
आज सोमवारी राष्ट्रीय महामार्गा संबंधीत कार्यालयीन कामानिमित्य सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता कार्यालयात गडचिरोली कार्यालयात आले होते. मात्र सकाळचे 11.15 वाजूनही कार्यालय कुलूपबंद अवस्थेत त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी तेथे आजुबाजूला चौकशी केली. मात्र, काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ताटीकोंडावार यांनी संबंधित विभागातील ज्येष्ठ अधिका-यांना थेट भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधित जाब विचारला. दरम्यान काही वेळात कार्यालयीन कर्मचारी कार्यालयात येण्यास सुरुवात झाली. दरम्यान सदर कार्यालय सुरु करण्यास तब्बल 12 वाजले. जिल्हा कार्यालयातील कर्मचाऱ्यांची वेळेला महत्व न देण्याची मानसिकता असेल तर अशावेळी अन्य ठिकाणी असलेल्या कार्यालयांची किती बिकट अवस्था असेल हे जिल्हास्थळावरील मुख्य कार्यालयीन प्रकारावरुन दिसून येते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांचे कार्यालयांवर किती वचक आहे, या विभागाच्या निष्काळजीपणातून स्पष्ट झाले.
————————————————–
लेटलतिफीचा प्रकार अशोभनिय
राष्ट्रीय महामार्गाच्या शासन स्तरावरुन कोट्यावधीचा निधी प्राप्त झाला असताना निकृष्ट बांधकामामुळे या मार्गावर अनेकांचे बळी गेले आहेत. तर अनेकांना विकलांगत्व आले आहे. या बांधकामातील गैरप्रकाराबाबत चौकशी करण्यासाठी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता न्यायालयाने चौकशीचे आदेशही दिले आहेत. यासंदर्भात माहिती जाणून घेण्याकरिता सदर कार्यालयाला आज मी भेट दिली. मात्र कार्यालयीन वेळेतही कार्यालय कुलूपबंद असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकाश अतिशय अशोभनिय असून संबंधित लेटलतिफ कर्मचा-यांची चौकशी करुन कारवाई करावी तसेच वरिष्ठ अधिका-यांची कानघाडणी करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडणार.
संतोष ताटीकोंडावार
अ.अ.भ.नि. समितीचे जिल्हाध्यक्ष