अहेरी : ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांच्या हाताला शाश्वत रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने उमेद अभियानाच्या माध्यमातून अहेरी तालुक्यात महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एकात्मिक शेती प्रभाग प्रकल्पांतर्गत इंदाराम येथे २ हजार पिल्लांची क्षमता असलेल्या पोल्ट्री मदर युनिटचा शुभारंभ शुक्रवारी (३० ऑक्टोबर) गटविकास अधिकारी महेश वाढई यांच्या हस्ते करण्यात आला.
उमेद–महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती अहेरी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत ४० समूह सदस्य महिलांना २८ दिवसांची कोंबडीची पिल्ले परसबागेतील कुक्कुटपालनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यातून महिलांना घरच्या घरी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करून अंडी उत्पादनाच्या माध्यमातून नियमित उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे, या पोल्ट्री मदर युनिटमधून वर्षभरात आठ बॅचचे उत्पादन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण महिलांना कुक्कुटपालन व्यवसायासाठी सातत्याने पिल्लांचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे. पारंपरिक उपजीविकेला पूरक व्यवसायाची जोड मिळाल्यास महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवी दिशा मिळू शकते.
या उद्घाटनप्रसंगी उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक सतीश उमरे, प्रभाग समन्वयक निलेश राऊत, ब्लॉक अँकर सौरभ चलाख तसेच धनलक्ष्मी समूहातील सर्व महिला सदस्य उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी महिला समूहाच्या या उपक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
घराच्या अंगणातून रोजगाराची नवी वाट!
ग्रामीण भागातील महिलांना केवळ बचत गटापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष उत्पादन आणि व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उमेद अभियानाचा हा प्रयत्न आहे. इंदाराम येथील पोल्ट्री मदर युनिटमुळे महिलांच्या हाताला रोजगार, कुटुंबाला उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत आणि ग्रामीण भागात अंडी उत्पादन व्यवसायाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.













