अहेरी : ग्रामीण व अतिदुर्गम भागातील विद्यार्थी, महिला, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी अहेरी आगारातून मानव विकास कार्यक्रम व जिजाऊ योजनेअंतर्गत अतिरिक्त बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. आदिवासी विद्यार्थी एकता मंचचे युवा नेते कैलाशभाऊ कोरेत यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक दुर्गम गावांतील विद्यार्थी व नागरिक एसटी बससेवेवर अवलंबून आहेत. मात्र अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे विशेषतः शाळा-महाविद्यालयीन वेळेत प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी आवश्यक मार्गांवर अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
दहा दिवसांत ५ अतिरिक्त बसेस देण्याची ग्वाही
निवेदनाची दखल घेत अहेरी आगार व्यवस्थापक अंकुश खाडिलकर यांनी जिजाऊ योजनेअंतर्गत दहा दिवसांत ५ अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. दुर्गम भागात अतिरिक्त बससेवा सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता अडथळा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शासन स्तरावर पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी तसेच जिजाऊ योजनेअंतर्गत महिला व विद्यार्थिनींसाठी आवश्यक मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच बंद किंवा अनियमित फेऱ्यांची तपासणी करून त्या पूर्ववत करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.
निवेदन सादर करताना कैलाश कोरेत, गुरुदास मडावी आणि उमेश पोरतेट उपस्थित होते.












