चंद्रपूर : शहरातील अष्टभुजा वॉर्ड परिसरात सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. गुरुवारी (१ ऑक्टोबर) करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले असून, या ठिकाणाहून दोन महिलांची सुटका करण्यात आली. कारवाईदरम्यान मोबाईल, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण २२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
अष्टभुजा वॉर्डातील लव्ह इंडिया चर्च परिसरातील एका घरात हा प्रकार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली. यासाठी पोलिसांनी आधी गोपनीयरीत्या परिस्थितीची पडताळणी केली. त्यानंतर संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकण्यात आला.
या कारवाईत मुस्कान शफीक शेख (४०) आणि रेशमा उर्फ तैबुल फतिमा अब्दुल रफीक शेख (४५) या दोघींना पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या तपासात दोघींच्या संगनमताने देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे समोर आल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळावरून २२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५ आणि ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.











