मूलचेरा : खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना आता वारंवार कृषी केंद्राच्या फेऱ्या मारण्याची किंवा गर्दीत रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. शासनाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) या डिजिटल प्रणालीद्वारे मोबाईलवरून खताचे बुकिंग करून QR कोडच्या माध्यमातून अधिकृत कृषी केंद्रातून खत खरेदी करता येणार आहे.
या डिजिटल प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मूलचेरा तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा केंद्र संचालकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर आणि कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी विकास पाटील उपस्थित होते.
यावेळी गुण नियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी नारायण लोलमवाड यांनी कृषी केंद्र संचालकांना FFS प्रणालीची कार्यपद्धती, शेतकरी नोंदणी, खत बुकिंग, उपलब्ध खतांची माहिती, अधिकृत विक्रेत्याची निवड तसेच QR कोडच्या माध्यमातून खत विक्रीची प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मोबाईलवरून घरबसल्या खत बुकिंग
FFS प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना मोबाईलच्या माध्यमातून आवश्यक खताची नोंदणी व बुकिंग करता येणार आहे. शेतकऱ्याची ओळख तसेच संबंधित जमीन व पिकाची माहिती तपासल्यानंतर उपलब्ध खतांमधून आवश्यक खताची नोंदणी करता येईल. त्यानंतर अधिकृत विक्रेत्याची निवड केल्यावर शेतकऱ्याला युनिक QR कोड प्राप्त होणार आहे.
हा QR कोड अधिकृत कृषी केंद्रावर दाखविल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून खताची खरेदी करता येणार आहे.
खत वितरणावर डिजिटल नजर
या प्रणालीमुळे खताची मागणी, उपलब्धता आणि प्रत्यक्ष विक्री यांची डिजिटल नोंद राहणार आहे. त्यामुळे खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यासोबतच उपलब्ध साठ्याचे नियोजन आणि निरीक्षण करणे कृषी विभागाला अधिक सुलभ होणार आहे. तसेच शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचून अनावश्यक गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
प्रशिक्षणादरम्यान कृषी केंद्र संचालकांना FFS प्रणालीचा वापर करताना घ्यावयाची काळजी, शेतकऱ्यांना बुकिंग प्रक्रियेत द्यावयाचे मार्गदर्शन आणि QR कोडच्या आधारे व्यवहार पूर्ण करण्याची पद्धत याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली.
मूलचेरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी FFS प्रणालीचा वापर करून अधिकृत कृषी केंद्रामार्फतच खत खरेदी करावी आणि डिजिटल खत विक्री प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले.











