मुलचेरा : अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागातील शाळांमध्ये तब्बल २६ वर्षे सेवा बजावत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान देणारे जि. प. उच्च प्राथमिक शाळा, गितालीचे पदवीधर प्राथमिक शिक्षक जानकीराम गोविंदराव पुलगमकर यांना जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. मुलचेरा तालुक्यातून त्यांची पुरस्कारासाठी निवड झाली. ५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास काळे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
पुलगमकर यांनी एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम व अतिसंवेदनशील बिड्री व झारेवाडा येथे १२ वर्षे ६ महिने, अहेरी तालुक्यातील गुर्जा बुज येथे ५ वर्षे, तर मुलचेरा तालुक्यातील गिताली येथे ९ वर्षे सेवा बजावली. या काळात अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या क्षमता, कौशल्य, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले.पुलगमकर यांच्या प्रयत्नांतून गिताली शाळेला ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा-२ मध्ये तालुकास्तरीय तृतीय पुरस्कार, तर टप्पा-३ मध्ये तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला. तसेच शाळेला जिल्हास्तरीय ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार प्राप्त झाला.शाळेतील विद्यार्थ्यांना थंड व शुद्ध पाणी, हँडवॉश स्टेशन यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी माजी विद्यार्थी संघ व समाजसहभागातून प्रयत्न केले. पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा शाळेच्या विकासात सहभाग वाढविण्यावरही त्यांनी भर दिला.
विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता कृतीआधारित, अनुभवाधारित आणि आनंददायी शिक्षण मिळावे, यासाठी विविध उत्पादक उपक्रम राबविले जात आहेत. यातून विद्यार्थ्यांमध्ये समूहकार्य, सर्जनशीलता, श्रमप्रतिष्ठा, जबाबदारीची भावना आणि विविध कौशल्यांचा विकास घडविण्यावर भर दिला जात आहे.अतिदुर्गम भागात प्रदीर्घ सेवा बजावत शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत मिळालेला हा पुरस्कार मुलचेरा तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या सन्मानाबद्दल शिक्षण क्षेत्रातून, सहकारी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून अभिनंदन होत आहे.
‘गुरुदेव रवींद्रनाथ टागोर बालउद्यान’ची निर्मिती
गिताली शाळेत ‘गुरुदेव रवींद्रनाथ टागोर बालउद्यान’ साकारण्यात आले आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेण्यात आला. शाळेचा परिसर सुंदर व आनंददायी बनविण्यासोबतच विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडणे, पर्यावरणाची जाणीव निर्माण करणे आणि शाळेबद्दल आपलेपणाची भावना वाढविणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
शालेय परसबागेतून अनुभवाधारित शिक्षण
गिताली शाळेत विविध फळभाज्या व पालेभाज्यांनी समृद्ध शालेय परसबाग विकसित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सहभागातून उभारलेल्या या परसबागेतून त्यांना शेती, पर्यावरण, पोषणमूल्ये आणि श्रमप्रतिष्ठेचे प्रत्यक्ष ज्ञान मिळत आहे. या उत्कृष्ट परसबागेला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन कौतुक केले आहे.












