अहेरी : अहेरी पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात कारवाई करत ३ हजार नग रॉकेट संत्रा देशी दारूच्या बाटल्या आणि होंडा सिटी कार असा एकूण ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आलापल्ली येथील श्रीराम चौकापासून सुमारे ७ किलोमीटर पूर्वेकडे करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे ६ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० ते ११ वाजताच्या दरम्यान संशयित होंडा सिटी कार क्रमांक एमएच ४८ एस ३६९८ची दोन पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनाच्या डिक्कीत खाकी रंगाच्या ३० खोक्यांमध्ये प्रत्येकी १०० नग याप्रमाणे एकूण ३ हजार नग रॉकेट संत्रा देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
जप्त करण्यात आलेल्या दारूची अवैध विक्री किंमत २ लाख ४० हजार रुपये, तर होंडा सिटी कारची अंदाजे जुनी वापरती किंमत ५ लाख १० हजार रुपये आहे. असा एकूण ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी वाहनचालक असलेल्या अज्ञात आरोपीविरुद्ध अहेरी पोलीस ठाण्यात अप.क्र. २९६/२०२६, कलम ६५ (अ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत मपोहवा/२६६२ वंदना डोनारकर यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोहवा/५६२ सरजु वेलादी करीत आहेत.
अवैध दारू वाहतुकीवर अहेरी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.












