मुलचेरा : तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल भाग म्हणून ओळख असलेल्या हेटलकसा (टोला) येथे चिमुकल्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या नूतन अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी अचानक पाहणी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
खनिकर्म योजनेअंतर्गत सुमारे १२ लाख रुपयांच्या निधीतून या अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. इमारतीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून सध्या अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे. चिमुकल्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज वातावरण मिळावे, यासाठी उर्वरित कामेही कोणताही विलंब न करता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.एटापल्ली दौऱ्यावर असलेले जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बांधकाम) दीपक बनाईट यांनी संयुक्तपणे हेटलकसा येथे भेट देऊन अंगणवाडीच्या कामाची पाहणी केली. यावेळी इमारतीची गुणवत्ता, सुरू असलेली अंतिम कामे आणि आवश्यक सुविधांबाबत अधिकाऱ्यांनी माहिती घेतली.
नूतन अंगणवाडी इमारत चिमुकल्यांसाठी अधिक सुरक्षित आणि सुसज्ज व्हावी, यासाठी इमारतीभोवती संरक्षण भिंत उभारण्याबाबतही अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. संरक्षण भिंतीसाठी आवश्यक अंदाजपत्रक (इस्टिमेट) तयार करून सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले.
दुर्गम भागातील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी अचानक सकाळी १० वाजताच्या सुमारास गावात दाखल झाल्याने संबंधित विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, अधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे दुर्गम भागातील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यानंतर अधिकाऱ्यांनी बोलेपल्ली गावालाही भेट देत पाण्याची टाकी तसेच इतर विकासकामांची पाहणी केली. गावातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनी पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न अधिकाऱ्यांसमोर मांडले.
दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील विकासकामे केवळ कागदावर न राहता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि गुणवत्ता तपासण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या या पाहणीमुळे स्थानिक नागरिकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी अमरी रॉय यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.













