अहेरी : तालुक्यातील अहेरी-देवलमरी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेसने पुकारलेले चक्काजाम आंदोलन अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. इंदारम परिसरात सकाळी ९.३० ते ११.५० वाजेपर्यंत तब्बल दोन तास वीस मिनिटे हे आंदोलन सुरू होते. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मागील अनेक वर्षांपासून अहेरी-देवलमरी मार्गाची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या २० ते २५ गावांतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार निवेदने देऊनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत काँग्रेसने हे आंदोलन केले.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यातच चक्क रोवणी करून शासन आणि प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. चक्काजाममुळे एसटी महामंडळाच्या बससह मोठ्या संख्येने खासगी वाहने अडकून पडली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने प्रवाशांना बराच वेळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता धम्मशील रामटेके यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबाबत विभागाच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर काँग्रेसने आंदोलन मागे घेतले.मात्र, केवळ आश्वासनावर न थांबता प्रत्यक्ष काम वेळेत पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. पंधरा दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली हनुमंतु मडावी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले असले, तरी पंधरा दिवसांच्या मुदतीत रस्त्यावरील खड्डे बुजविले जातात का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.













