अहेरी:तालुक्यातील देवलमरी रस्त्याची दुरवस्था आता थेट आंदोलनापर्यंत पोहोचली आहे. मागील अनेक वर्षांपासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या २० ते २५ गावांतील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करत काँग्रेसने आज चक्काजाम आंदोलन पुकारलं आहे.
अहेरी-देवलमरी मार्गावरील इंदारम परिसरात सकाळी साडेनऊ वाजतापासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे गेल्या दोन तासांपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे, आंदोलकांनी रस्त्यावरील खड्ड्यातच रोवणी करून प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला.काँग्रेसचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सात दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देत रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आज हे आंदोलन करण्यात आलं.
चक्काजाममुळे देवलमरी परिसरातील कर्मचारी, एसटी बस आणि खासगी वाहनं रस्त्यातच अडकली आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम मंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच अहेरीत रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात झालेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.













