गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता केवळ निलंबनाची कारवाई न करता थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला. मात्र, कोणावर कारवाई करण्याची आपली इच्छा नसून विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा मिळाव्यात, हीच प्रशासनाची भूमिका आहे. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अहेरी तालुक्यातील विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंगळवारी अहेरी तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी एकलव्य आश्रमशाळेलाही भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. मंगळवारी अहेरी येथे मुक्काम केल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खमणचेरू येथील शासकीय आश्रमशाळेला अचानक भेट दिली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधा, वसतिगृहातील व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान वसतिगृह, वर्गखोल्या तसेच शाळेच्या परिसराची त्यांनी बारकाईने पाहणी केली. विद्यार्थ्यांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध आहेत का, खिडक्यांना डास, किटक आणि इतर जीवांपासून संरक्षणासाठी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत का, स्वच्छता योग्य पद्धतीने राखली जाते का, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत का, याची त्यांनी तपासणी केली.विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर, अतिरिक्त खाटा तसेच बसण्यासाठी बेंचेसची आवश्यकता असल्याचे विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांच्या या मागण्यांची तत्काळ नोंद घेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
आश्रमशाळेची सुंदर इमारत पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी तिचे कौतुक केले. मात्र, इमारत चांगली असण्यासोबतच विद्यार्थ्यांना आवश्यक नागरी सुविधा आणि सुरक्षित वातावरण मिळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वसतिगृह आणि इतर नागरी सुविधांशी संबंधित दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हाती घ्यावीत, तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.मला कोणावरही कारवाई करण्याची इच्छा नाही. मात्र, विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा देण्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले, तर केवळ निलंबनावर विषय थांबणार नाही,थेट गुन्हा दाखल करण्याची कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुविधा आणि सुरक्षिततेबाबत प्रशासन किती गंभीर आहे, हे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यावर जिल्हाधिकारी पंडा यांनी भर दिला. या भेटीदरम्यान उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ, तहसीलदार बालाजी सोमवंशी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) धनराज डबले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) एस. पी. डोंगरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.













