गडचिरोली : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा दक्षिण गडचिरोलीत पूरस्थिती निर्माण केली आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक प्रभावित झाली असून, मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिकाही पुराच्या पाण्यात अडकल्याची गंभीर घटना समोर आली आहे. आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नंदीगाव नाल्याचा पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली आहे.
जिमलगट्टा येथील मलय्या पन्हटीवार (वय 65) हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे उपचार सुरू होते. नियमित डायलिसिससाठी त्यांना गडचिरोली येथे जावे लागत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना हेडरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह घेऊन जात असताना आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-सीवरील नंदीगाव नाल्यावरील पूल पुराच्या पाण्याखाली गेला. त्यामुळे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका रस्त्यातच अडकली. पाणी वाढल्याने या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे.
जिल्ह्यात सरासरी 48.2 मिमी पाऊस
24 ऑगस्ट रोजीच्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार गडचिरोली जिल्ह्यात सरासरी 48.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सर्व 45 पर्जन्यमापक मंडळांमध्ये पावसाची नोंद झाली असून, देसाईगंज मंडळात सर्वाधिक 117 मिमी पाऊस झाला आहे.
कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे 112.4 मिमी, सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली येथे 88.6 मिमी, अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे 75.4 मिमी, भामरागड येथे 73 मिमी तर एटापल्ली येथे 71.4 मिमी पावसाची नोंद झाली.
याशिवाय कोरची येथे 70.2 मिमी, वैरागड येथे 66 मिमी आणि चातगाव येथे 65.4 मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील 8 पर्जन्यमापक मंडळांमध्ये 65 मिमीपेक्षा अधिक पाऊस नोंदवण्यात आला आहे.
भामरागडचा पुन्हा संपर्क तुटला
मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती नद्यांना मोठा पूर आला आहे. पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क पुन्हा एकदा तुटला आहे.
दक्षिण गडचिरोलीतील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. रस्ते आणि पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पावसाची ठळक आकडेवारी
जिल्ह्याची सरासरी : 48.2 मिमी
देसाईगंज : 117 मिमी
कढोली, कुरखेडा : 112.4 मिमी
असरअल्ली, सिरोंचा : 88.6 मिमी
जिमलगट्टा, अहेरी : 75.4 मिमी
भामरागड : 73 मिमी
एटापल्ली : 71.4 मिमी
कोरची : 70.2 मिमी
वैरागड : 66 मिमी
चातगाव : 65.4 मिमी













