भामरागड :-भामरागड तालुका मुख्यालयाला २९ जुलै रोजी पर्लकोटा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने महापूर आला होता. या महापुरामुळे भामरागड तालुक्यातील नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. आता पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने भामरागडचा जगाशी संपर्क तुटला आहे.
मागील पुराच्या फटक्यातून सावरण्यासाठी तालुकावासीयांना वेळही मिळाला नाही, तोच पुन्हा पूरस्थिती उद्भवल्याने भामरागडवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भामरागड तालुका मुख्यालयाला लागूनच असलेल्या पर्लकोटा नदीला दरवर्षी पूर येत असतो, मात्र यावर्षी अचानकपणे पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, या नुकसानीचे सर्वेक्षण शासन स्तरावरून सुरू करण्यात आले आहे.अनेक खाजगी व सेवाभावी संस्था आजही भामरागडवासीयांना मदतीचा हात देत आहेत, तर शासनाकडून मदत मिळणे अजूनही बाकी आहे. त्यातच आता पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने तालुकावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे.













