भामरागड:- भामरागड तालुक्याला आजवर थेट गटशिक्षणाधिकारी मिळाले नव्हते. मात्र आता परिवीक्षाधीन कालावधीत असलेले गणेश पाटील हे या तालुक्यासाठी पहिले थेट गटशिक्षणाधिकारी ठरले आहेत.
नुकतेच भामरागड तालुक्यात नव्याने रुजू झालेले गटशिक्षणाधिकारी गणेश पाटील हे मूळचे कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे परिवीक्षाधीन कालावधीतच भामरागड तालुक्याची धुरा सोपविण्यात आली आहे.भामरागड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तालुक्यातील 60 टक्के शाळा बंद अवस्थेत आहेत. ज्या शाळा सुरू आहेत तिथेही पुरेसे शिक्षक नाहीत. काही शाळांमध्ये तर शिक्षक जातच नाहीत. एवढेच नव्हे तर अनेक शाळांतील शिक्षक राष्ट्रीय कार्यक्रमांनाही दांडी मारतात. त्यामुळे भामरागड तालुक्यात “शिक्षणाचा अधिकार” हा विषय कितपत सार्थ आहे, हा प्रश्न यातून उपस्थित होतो.
सध्या भामरागड तालुक्यात 59 शाळा असून त्यामध्ये 1229 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र ज्या शाळांमध्ये शिक्षकच जात नाहीत, त्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.नव्याने रुजू झालेले गटशिक्षणाधिकारी तरुण आणि थेट असल्यामुळे त्यांच्या कार्यकाळात तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा कायापालट होणार की “जैसे थे” स्थिती कायम राहणार, याकडे आता तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.













