अहेरी : आलापल्ली वन विभागांतर्गत येणारे पेडीगुडम वनपरिक्षेत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुलचेरा तालुक्यातील या वनपरिक्षेत्रात जेसीबी, फोकलीन यांसारख्या यंत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणात झाडांची अवैध तोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. उदयनगर ते मुलचेरा मार्गावरील दीना नदीच्या काठावर अनेक मोठी झाडे तोडून नदीपात्रात तसेच परिसरात टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे.
पेडीगुडम वनपरिक्षेत्रात गोमणी, येलचील, मुकडी आणि मुलचेरा अशी चार उपक्षेत्रे आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक तसेच मोठ्या संख्येने वनरक्षक कार्यरत असताना जंगलाच्या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असताना ती वनविभागाच्या निदर्शनास कशी आली नाही, हा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.वनविभागाचे प्रमुख कर्तव्य म्हणजे वनक्षेत्राचे संरक्षण करणे, अवैध वृक्षतोड रोखणे, वनसंपदेवर नियमित गस्त ठेवणे आणि जंगलाची हानी करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करणे. मात्र पेडीगुडम परिसरातील सद्यस्थिती पाहता या कर्तव्याच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वनविभागाकडे जंगलाचा नकाशा; मग झाडे गायब होण्याची नोंद नाही का?
वनक्षेत्राची सीमा, नोंदवही, वननकाशे तसेच विविध भागातील वनसंपदेची अधिकृत माहिती वनविभागाकडे उपलब्ध असते. त्यामुळे एखाद्या परिसरातील पूर्वीचे वनक्षेत्र आणि सध्याची प्रत्यक्ष स्थिती याची तुलना करणे वनविभागासाठी अशक्य नाही. पेडीगुडम वनपरिक्षेत्रातील संबंधित भागात पूर्वी किती घनदाट जंगल होते, सध्या किती वृक्ष उरले आहेत आणि गेल्या काही वर्षांत किती वनसंपदा कमी झाली, याचे सर्वेक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे मोठमोठी झाडे तोडण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर झाल्याचे आरोप असताना हा प्रकार केवळ एखाद्या व्यक्तीच्या चोरीछुप्या हालचालीपुरता मर्यादित आहे की नियोजनबद्ध पद्धतीने जंगल साफ करण्याचा प्रकार सुरू आहे, याची चौकशी होणे आवश्यक आहे.
झाडे नदीपात्रात; तरीही वनकर्मचाऱ्यांच्या नजरेत कसे आले नाही?
दीना नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात तोडलेली झाडे आढळून येत आहेत. काही झाडे थेट नदीपात्रात टाकण्यात आली असून परिसरातही कापलेल्या झाडांचे अवशेष आणि मोठे ओंडके पडून असल्याचे दिसून येत आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी बंधाऱ्याचे काम झाले. बंधारा पाहण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. मात्र नियमित गस्त घालणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना ही वृक्षतोड आधी का दिसली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुख्यालयात न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तस्करांना मोकळे रान?
पेडीगुडम वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास न राहता आष्टी, अहेरी, आलापल्ली आदी ठिकाणांहून ये-जा करत असल्याची चर्चा आहे. वनक्षेत्राच्या सुरक्षेसाठी नियुक्त कर्मचारीच मुख्यालयी राहत नसतील, तर दुर्गम भागातील जंगलावर नियमित देखरेख कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोड, सागवान लाकूड तस्करी, रेती तस्करी आणि वन्यजीवांच्या शिकारीबाबत यापूर्वीही चर्चा होत असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. यापूर्वीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्यानंतरही या क्षेत्रातील गैरप्रकारांच्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.













