गडचिरोली: दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असतानाच एटापल्ली तालुक्यात शिक्षण विभागाच्या तपासणीदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गटशिक्षणाधिकारी ऋषिकेश बुरडकर यांनी शाळांना दिलेल्या भेटीदरम्यान कसनसूर आणि कोटमी केंद्रांतर्गत तब्बल नऊ शिक्षक अनधिकृतपणे गैरहजर आढळून आले. या सर्व शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला आहे.
एटापल्ली तालुक्यात गट्टा, कसनसूर, घोटसूर, जारावंडी, दोलंदा, कोटमी, सुरजागड यांसह एकूण आठ केंद्रांचा समावेश आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोनशेहून अधिक शाळा असून त्यापैकी अनेक शाळा दुर्गम भागात आहेत. अशा परिस्थितीत अधिकारी नियमितपणे शाळांपर्यंत पोहोचत नसल्याचा फायदा घेत काही शिक्षकांकडून कर्तव्यात हलगर्जीपणा होत आहे का, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान गैरहजर आढळलेल्या शिक्षकांमध्ये प्रकाश सावजी मडावी (कसनसूर), साईनाथ एकनाथ तिमाडे (गडेरी), प्रकाश रघुनाथ मोहुर्ले (आसांवडी), वसंत झुगाजी गव्हारे (झुरी), पितांबर पुंडलिक चापले (नैनगुडा), कृष्णानाथ हरीसाय बडा (हालेवारा), दीपक गोपाल मंडल (वेनासर), महादेव राजाराम दुर्गे (कोटमी) आणि रेखचंद कैकाळू वाळके (कोईदुळ) यांचा समावेश आहे.
याप्रकरणी २० ऑगस्ट रोजी एटापल्ली पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून संबंधित शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. १८ आणि १९ ऑगस्ट रोजी शालेय वेळात भेट दिली असता संबंधित शिक्षकांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनुपस्थित असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. संबंधित शिक्षकांना तीन दिवसांच्या मुदतीत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
एटापल्ली तालुक्यात अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असतानाच कार्यरत शिक्षकही शाळेवर उपस्थित राहत नसतील, तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होण्याची शक्यता आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना नियमित आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रशासनाने अधिक काटेकोरपणे देखरेख करण्याची गरज आहे.
शाळांमध्ये बायोमेट्रिक अथवा ऑनलाइन उपस्थिती प्रणाली सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्ष शाळेतील उपस्थिती आणि ऑनलाइन नोंद यामध्ये तफावत आहे का, तसेच हजेरीनुसारच वेतन काढले जाते का, याचीही तपासणी होणे आवश्यक आहे.
एका दौऱ्यात नऊ गैरहजर; मग अतिदुर्गम भागात काय?
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीत एकाच वेळी नऊ शिक्षक अनधिकृतपणे गैरहजर आढळल्याने शिक्षण विभागाच्या नियमित देखरेखीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिकारी भेटीच्या वेळीच ही परिस्थिती समोर आली असेल, तर अधिक दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील शाळांची प्रत्यक्ष स्थिती काय असेल, याचीही तपासणी होणे गरजेचे आहे. संबंधित शिक्षकांच्या खुलाशानंतर त्यांच्यावर कोणती कार्यवाही केली जाते, याकडे पालक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
——————————————
शिक्षक अनधिकृतपणे गैरहजर आढळल्याचा प्रकार गंभीर आहे. याबाबत संपूर्ण माहिती घेऊन संबंधित शिक्षकांचे खुलासे तपासण्यात येतील. दोष आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमित व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते की नाही, तसेच शिक्षकांची उपस्थिती आणि शैक्षणिक कामकाजाची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी मी स्वतःही दुर्गम भागातील शाळांना भेटी देऊन तपासणी करणार आहे.
-प्रेरक उजगारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. गडचिरोली













