भामरागड : शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, पात्र ठरलेल्या सहा लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वितरित करण्यात आले. तहसील कार्यालय, भामरागड येथील सभागृहात १९ ऑगस्ट रोजी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते या पट्ट्यांचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या २५ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार भामरागड शहरातील शासकीय क्षेत्रातील जमिनीवर करण्यात आलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची मोहीम नगरपंचायत भामरागडमार्फत राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून अतिक्रमित जागेच्या योग्य पुराव्यांसह जमिनीचा पट्टा मिळण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.
प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र ठरलेल्या सहा जमीनधारकांना आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते पट्टे वितरित करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, नगराध्यक्ष रमााई महाका, मुख्याधिकारी अभिजीत सोनवणे, उपअधीक्षक भूमिअभिलेख विठ्ठल जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, नगरपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवासी वापरासाठी केलेल्या १,५०० चौ. फु.पर्यंतच्या अतिक्रमणधारकांनी, तसेच १,५०० चौ. फु.पेक्षा अधिक क्षेत्रावर अतिक्रमण असलेल्या लाभार्थ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नगरपंचायत भामरागड कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजीत सोनवणे यांनी केले आहे.













