अहेरी : अहेरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात नव्या गटशिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असून सुरज भास्कर वागस्कर यांनी काल, १७ ऑगस्ट रोजी गटशिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या रुजू होण्याने पंचायत समितीच्या शिक्षण विभागात नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश वाढई, माजी गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वागस्कर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.दरम्यान, सुरज वागस्कर यांच्या नियुक्तीपूर्वी अहेरीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार सिरोंचा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील आईंचवार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. आता वागस्कर यांनी पदभार स्वीकारल्याने हा अतिरिक्त प्रभार संपुष्टात आला आहे.
अहेरी तालुक्यात जिल्हा परिषद व खासगी मिळून २३२ शाळा असून १२ केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे शाळांचे प्रशासन, शिक्षकांचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर लक्ष देण्याची जबाबदारी नव्या गटशिक्षणाधिकाऱ्यांवर असणार आहे.













