गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात धानोरा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. वानरचुवा जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून अवैध हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली. या कारवाईत तब्बल 3 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला असून, दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दि. 16 ऑगस्ट रोजी धानोरा पोलिसांना वानरचुवा परिसरात मोहफुलाच्या सडव्यापासून हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने जंगल परिसरात धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी प्रमोद अंताराम हलामी हा घटनास्थळावरून पसार झाला.
पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता 15 प्लास्टिक ड्रममध्ये सुमारे 3 हजार किलो मोहफुलाचा सडवा, तसेच 20 लिटर तयार हातभट्टी दारू आढळून आली. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 3 लाख 4 हजार रुपये असून, हातभट्टी साहित्य, दारू आणि मोहफुलाचा सडवा नियमानुसार घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.
यानंतर पोलिसांना शिवराम अन्नाजी बोगा हा आपल्या घराशेजारील झोपडीत मोहफुलाची दारू विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या ठिकाणी छापा टाकला असता 200 लिटर मोहफुलाची दारू, अंदाजे 40 हजार रुपये किमतीची, आढळून आली. ही दारूही घटनास्थळीच नष्ट करण्यात आली.
या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 3 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. प्रमोद हलामी याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 88/2026, तर शिवराम बोगा याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 89/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.













