गडचिरोली : नांगपूरच्या जंगल परिसरात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि कोटगुल पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकत तब्बल 34 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रकमेसह 23 चारचाकी, 5 दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 1 कोटी 50 लाख 97 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण 36 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जुगार अड्डा चालविण्याचा आरोप असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे.
दि. 17 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 2 वाजता नांगपूर येथील जंगल परिसरात ताशांच्या पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहितीच्या आधारे सपोनि. भगतसिंग दुल्हत यांच्या पथकाने पंचांसह घटनास्थळी धाड टाकली.
पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखा आणि कोटगुल पोलिसांच्या पथकाने कारवाई करत 34 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत तसेच घटनास्थळावरून 4 लाख 41 हजार 500 रुपये रोख, 23 चारचाकी, 5 दुचाकी, ताशांचे पत्ते, स्टीलची पेटी, बॅटरी आणि ताडपत्री असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीत परमेश्वर लोहंबरे (रा. नांगपूर) आणि मिथुन तांबेकर (रा. कोटगुल) यांच्या सांगण्यावरून जुगार खेळण्यासाठी आल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांसह एकूण 36 आरोपींविरुद्ध कोटगुल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कोटगुल पोलिसांच्या पथकाने सहभाग घेतला. पुढील तपास पोउपनि. विवेक वायकर करीत आहेत.













