मुलचेरा : आष्टी-मुलचेरा मार्गावर चारचाकी वाहनातून अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर मुलचेरा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत दारूसह स्कोडा कार, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ९१ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुलचेरा पोलिसांचे पथक १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी रेंगेवाही ते मल्लेरा मार्गावर पेट्रोलिंग करीत असताना, एक व्यक्ती चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक करून विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष संशयित वाहनाची तपासणी केली.
वाहनाच्या डिक्कीत २० हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या ५०० प्लास्टिक निपा तसेच १६ हजार ८०० रुपये किमतीच्या रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या सहा दोन लिटरच्या बाटल्या आढळून आल्या. यासोबतच सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीची स्कोडा लॉरा कार, ५ हजार रुपयांचा रियलमी मोबाईल आणि ११० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भाग्यवान लक्ष्मण ताडशेटीवार (वय ५४, रा. कंरजी, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई मुलचेरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल वि. बागल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास सफौ चरणदास कुकडकार करीत आहेत.













