गडचिरोली : शाळांच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीचा वेळेत व उद्देशपूर्ण विनियोग करून त्याचे परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणात दिसले पाहिजेत, असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला.
जिल्ह्यातील आदर्श व पीएम श्री शाळांच्या कामांचे मूल्यमापन करून प्रलंबित कामांची कारणे शोधा आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. कमी पटसंख्या असलेल्या २० पर्यंत पटसंख्या असलेल्या ६४२ शाळांचे शाळानिहाय विश्लेषण करून विद्यार्थी संख्या व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना विज्ञान आणि संशोधनाची गोडी लागावी यासाठी किमान १०० विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ अभ्यासभेट आयोजित करण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही डॉ. भोयर यांनी दिल्या. तसेच अधिकाऱ्यांनी केवळ प्रशासकीय कामकाजापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन अध्यापन, विद्यार्थ्यांची उपस्थिती, सुविधांचा वापर आणि शैक्षणिक गुणवत्तेची पडताळणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
शासनाकडून मिळणारा निधी, पायाभूत सुविधा, शिक्षक प्रशिक्षण आणि विविध शैक्षणिक उपक्रमांचा केंद्रबिंदू विद्यार्थी असला पाहिजे, असे डॉ. भोयर यांनी सांगितले. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनीही उपलब्ध निधीचा पूर्ण विनियोग गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.













