गडचिरोली: एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीची विकासाची प्रतिमा आता झपाट्याने बदलत आहे. दळणवळण, उद्योग, खनिकर्म, शिक्षण, कौशल्य विकास आणि सुरक्षेच्या क्षेत्रात होत असलेल्या बदलांमुळे गडचिरोलीकडे देशाचे लक्ष वेधले गेले आहे. ‘विकसित गडचिरोली जिल्हा–व्हिजन २०४७’च्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नियोजनबद्ध दिशा मिळेल आणि गडचिरोलीच्या विकासातून संपूर्ण विदर्भाच्या प्रगतीला नवी गती मिळेल, असा विश्वास राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.गडचिरोली येथे ‘विकसित गडचिरोली जिल्हा–व्हिजन २०४७’ आराखड्यासंदर्भातील दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
जिल्ह्याची बलस्थाने, कमतरता, उपलब्ध संधी आणि भविष्यातील आव्हाने यांचा सर्वंकष विचार करून विकासाचा रोडमॅप तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
गडचिरोलीची समृद्ध जंगलसंपदा, आदिवासी संस्कृती, खनिज संपत्ती, शेती, जलसंपदा आणि कष्टाळू तरुणाई ही जिल्ह्याची मोठी ताकद आहे. या संसाधनांचा योग्य वापर करून त्याचा लाभ स्थानिक नागरिक, शेतकरी, तरुण आणि उद्योजकांना मिळवून देणे आवश्यक असल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले.
दळणवळण सुविधांमध्ये झालेल्या सुधारणांमुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी नागपूर-भंडारा आणि पुढे गडचिरोलीपर्यंत जोडण्याच्या दिशेने काम सुरू असल्याने शेतीमाल व औद्योगिक उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
गडचिरोलीला देशातील महत्त्वाचे स्टील हब बनविण्याच्या दिशेनेही प्रयत्न सुरू असून २०३० पर्यंत ५० दशलक्ष टन लोहखनिज उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुरजागडसह जिल्ह्यातील खनिकर्म क्षेत्राचा सर्वाधिक लाभ स्थानिक तरुण आणि नागरिकांना मिळावा, यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शासकीय शाळांमध्ये दर्जेदार शैक्षणिक व पायाभूत सुविधा, आदर्श शाळांची संख्या वाढविणे तसेच कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यावरही शासनाचा भर आहे. गडचिरोलीतील तरुणांनी शिक्षण, क्रीडा, व्यवसाय, कला आणि सामाजिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवावा, असे आवाहन त्यांनी केले.
नक्षलवादाच्या आव्ह्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात आले असून, आत्मसमर्पण केलेल्या युवक-युवतींना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानामुळे गडचिरोलीतील सुरक्षाव्यवस्थेतही मोठा बदल झाल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले.
दरम्यान, दोन दिवसीय कार्यशाळेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी, प्रशासन, संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून ‘विकसित गडचिरोली–व्हिजन २०४७’चा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या विचारमंथनानंतर २६ ऑगस्ट रोजी जिल्हा स्थापना दिनी व्हिजन डॉक्युमेंटचे सादरीकरण केले जाणार असून त्यानंतर १५ दिवस नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नगराध्यक्षा प्रणोती निंभोरकर, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक व पत्रकार उपस्थित होते.













