गडचिरोली: विकासाची गती वाढविताना गडचिरोलीचा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपून स्थानिकांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. रस्ते, पूल, पाणी, आरोग्य, रेल्वे आणि विमानतळ अशा पायाभूत सुविधांना गती देत ‘विकसित गडचिरोली’सोबतच ‘रोजगार देणारी गडचिरोली’ घडविण्याचा संकल्प असल्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात ॲड. जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅप मांडला.
रस्त्यांसाठी २६०० कोटींचा निधी
गडचिरोलीतील रस्त्यांची मोठी लांबी लक्षात घेता अर्थसंकल्पातून सुमारे २६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे मजबूत करण्याचे काम सुरू असून, पुलांचा अनुशेषही टप्प्याटप्प्याने दूर केला जात आहे. जल जीवन मिशन, नगरोत्थान आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या सुविधांनाही गती देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दुर्गम भागात पोहोचणार ‘हॉस्पिटल ऑन व्हील’
गडचिरोलीच्या दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यसेवेसाठी दूरवर जावे लागू नये, यासाठी लवकरच ‘हॉस्पिटल ऑन व्हील’ उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून दुर्गम भागातच आरोग्य तपासणी आणि आवश्यक उपचार सुविधा पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
रेल्वे, विमानतळ आणि उद्योगांना चालना
जिल्ह्यात रेल्वेचे काम वेगाने सुरू असून विमानतळ उभारण्याचाही शासनाचा संकल्प आहे. गडचिरोलीच्या खनिज संपत्तीवर आधारित उद्योग जिल्ह्यातच उभे राहावेत आणि त्यातून स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाने रोडमॅप तयार केला आहे. रोजगारासाठी युवकांना जिल्ह्याबाहेर जावे लागू नये, हा विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
नक्षलमुक्तीसाठी जवानांचे योगदान अविस्मरणीय
गडचिरोलीला शांततेच्या दिशेने नेण्यासाठी पोलीस जवानांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी विशेष कौतुक केले.नक्षलवादाविरोधातील लढ्यात अनेक जवानांनी बलिदान दिले असून त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही, असे ते म्हणाले. ‘दादालोरा खिडकी’सह विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविल्या जात आहेत. जिल्ह्यातील ७५ वाचनालयांमधून सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांना सुविधा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
३० हजार आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी सुविधा
आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत पुढील सहा महिन्यांत जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सर्पदंशामुळे होणारे मृत्यू कमी करून भविष्यात ते शून्यावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा आधा
कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २ हजार ६७१ शेतकऱ्यांना १५.९१ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.स्ट्रॉबेरी, शिंगाडा आणि ‘कलेक्टर आंबा’ यांसारख्या उत्पादनांना प्रोत्साहन देत पीक विविधीकरणावर भर दिला जात आहे. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतमजुरांनाही अपघात सानुग्रह योजनेचा लाभ
‘गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान’ योजनेची व्याप्ती
वाढविण्यात आली असून शेतमजूर कुटुंबांनाही योजनेच्या कक्षेत आणण्यात येणार आहे. अनैसर्गिक मृत्यूच्या प्रसंगी दोन लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.
महिलांच्या आरोग्यासाठीही विशेष भर
जिल्ह्यातील महिलांना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यात १०० टक्के महिलांपर्यंत योजना पोहोचविण्याचा मानस असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे.
गोंडवाना विद्यापीठासाठी ५०० कोटींची कामे
शिक्षण क्षेत्रात गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांची कामे सुरू असून चंद्रपूर उपकेंद्रासाठी ४६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
दरडोई उत्पन्नात गडचिरोलीला पहिल्या दहात आणण्याचे लक्ष्य
दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत गडचिरोली सध्या राज्यातील शेवटच्या पाच जिल्ह्यांमध्ये आहे. मात्र जिल्ह्याच्या नैसर्गिक, खनिज आणि मानवी संपत्तीचा योग्य वापर करून गडचिरोलीला दरडोई उत्पन्नात राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये आणण्याचे लक्ष्य असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
गडचिरोलीच्या विकासासाठी नागरिकांना जिल्ह्याबाहेर जावे लागू नये, तर याच भूमीत रोजगार, उद्योग आणि समृद्धी निर्माण व्हावी, अशी शासनाची भूमिका आहे. हा विकास केवळ शासन, लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी शक्य नसून त्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जल, जमीन आणि जंगलाशी कोणतीही तडजोड न करता विकासाचा वेग कायम ठेवत गडचिरोलीचा नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपून समृद्ध, रोजगारक्षम आणि विकसित गडचिरोली घडविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि व्यक्तींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी,अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













