गडचिरोली: नक्षलविरोधी अभियानात धाडसी कामगिरी बजावणाऱ्या गडचिरोली पोलीस दलाच्या शौर्याची पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये गडचिरोली पोलीस दलातील २० अधिकारी व अंमलदारांना ‘पोलीस शौर्य पदक’, तर एका अधिकाऱ्याला ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ जाहीर झाले आहे.
देशभरात यंदा २७२ पोलीस शौर्य पदके आणि ६०६ गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके जाहीर झाली असून, त्यामध्ये गडचिरोलीचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे, सन २०२६ मध्ये गडचिरोली पोलीस दलाला आतापर्यंत एकूण ३१ पोलीस शौर्य पदके मिळाली आहेत.
भामरागडमधील धाडसी कारवाईची दखल
सन २०२३ मध्ये केडमारा, ता. भामरागड आणि सन २०२४ मध्ये कंत्रनगट्टा, ता. भामरागड येथे झालेल्या पोलीस-माओवादी चकमकींमध्ये गडचिरोली पोलिसांनी एकूण ६ माओवाद्यांचा खात्मा केला होता. या कारवायांमध्ये दाखविलेल्या धाडस, शौर्य आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत संबंधित अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.
पोलीस शौर्य पदक मिळालेल्यांमध्ये यतिश विजयराव देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर (तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक, अभियान, गडचिरोली) तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पांडुरंग गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वासुदेव राजम मडावी यांच्यासह दिलीप विठ्ठल आत्राम, मासा बोरा आत्राम, विजय किष्टय्या कोडापे, दशरथ रामशहा मडावी, अजय गोपालराव मडावी, गणेश चंद्रम डुब्बुला, विजय झुरु मडावी, भुपेश मारोतराव जुमनाके, राकेश राजम बेडकी, सुधाकर जगन पोरतेट, श्रीनिवास समय्या निष्ठुरी, गणेश हनमंतू गंजीवार, नितेश प्रभुदास टेंभेकर, शिवाजी मेस्सो हिचामी, संजय मल्लेश कंकाबंडावार, राजेश शामराव किरंगे आणि दलसु कटिया बोगामी यांचा समावेश आहे.
पाच वर्षांत ३ शौर्यचक्र, २३७ शौर्य पदके
गडचिरोली पोलीस दलाच्या शौर्याची ही परंपरा सातत्याने कायम आहे. मागील पाच वर्षांत दलाला ३ शौर्यचक्र, २३७ पोलीस शौर्य पदके आणि ७ गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके प्राप्त झाली आहेत. नक्षलविरोधी अभियानात जीवाची पर्वा न करता बजावलेल्या कर्तव्याची ही राष्ट्रीय पातळीवरील पावती मानली जात आहे.
३० अधिकारी-अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदके
याशिवाय, गृह मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने २५ वर्षांपेक्षा अधिक काळ निष्कलंक सेवा बजावणाऱ्या २७ अधिकारी-अंमलदारांना ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’, तर १५ वर्षांपेक्षा अधिक निष्कलंक सेवा बजावणाऱ्या ३ अधिकारी-अंमलदारांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे.
या सर्व पदकविजेत्या अधिकारी व अंमलदारांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गडचिरोलीच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावताना दाखविलेल्या शौर्याला मिळालेला हा सन्मान संपूर्ण पोलीस दलासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.













