गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संबंधित आश्रमशाळा बंद करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात आली असून, मुख्याध्यापकांसह दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मागील एक वर्षात या आश्रमशाळेची तपासणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
घटनेची गंभीर दखल घेत संबंधित संस्थेच्या सचिवांना यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयाच्या सविस्तर अहवालाच्या आधारे जपतलई येथील संबंधित अनुदानित आश्रमशाळा बंद करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात आली आहे.
मुख्याध्यापकांसह दोन्ही अधीक्षकांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोलीचे सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) डॉ. प्रभू पुन्या सादमवार यांच्या फिर्यादीवरून धानोरा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 86/2026 नोंदविण्यात आला आहे.पोलीस नोंदीनुसार, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रशांत विलासराव ताटपल्लीवार (वय ५१), महिला वसतिगृह अधीक्षिका भाग्यश्री ज्ञानेश्वर चिंल्लमवार (वय ३४) आणि वसतिगृह अधीक्षक भास्कर रामचंद्र भोयर (वय ५०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नोंदीनुसार, १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजता जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत ही घटना घडली. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा केल्याचा आरोप असून, सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या अनुषंगाने संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), ३(५) तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ मधील कलम ७५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलीस नोंदीत नमूद आहे.
तपासणी करणारे अधिकारीही रडारवर
आश्रमशाळेच्या नियमित देखरेख आणि तपासणीच्या जबाबदारीबाबतही प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलली आहेत. मागील एक वर्षात जपतलई आश्रमशाळेची तपासणी करण्यासाठी गेलेल्या संबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून, तपासणीदरम्यान काही त्रुटी किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवरही नियमानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
नागपूर अपर आयुक्तालयातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची अचानक तपासणी
जपतलई दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आदिवासी विकास विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
नागपूर अपर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची अचानक तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तपासणी अधिक निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावी यासाठी एका प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अन्य प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील आश्रमशाळांची तपासणी करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.
यासाठी स्वतंत्र आणि सुटसुटीत तपासणी प्रपत्र तयार करण्यात आले असून, त्याद्वारे आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षा, निवासी व्यवस्था, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि इतर आवश्यक बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी कॉट आणि पायाभूत सुविधांवर भर
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या निवासी व्यवस्थेत सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने सर्व अनुदानित आश्रमशाळांना विद्यार्थ्यांसाठी कॉट तसेच आवश्यक पायाभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि योग्य निवासी वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित शाळांनी गांभीर्याने पार पाडावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
अनुदानित आश्रमशाळांचे तृतीय-पक्ष ऑडिट होणार?
अनुदानित आश्रमशाळांमधील व्यवस्थेचे अधिक निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी तृतीय-पक्ष ऑडिटचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव सध्या शासनस्तरावर विचाराधीन आहे.या ऑडिटच्या माध्यमातून आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षा, निवासी व्यवस्था, पायाभूत सुविधा आणि शासनाने निश्चित केलेल्या निकषांचे पालन यांचे स्वतंत्रपणे मूल्यमापन करण्याचा उद्देश आहे.
दोष आढळल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई
जपतलई दुर्घटनेतील जबाबदारी निश्चित करण्यासोबतच भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळांच्या सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे.
तपासणीदरम्यान दोष किंवा त्रुटी आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.













