मुलचेरा : येथील पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेश विधाते यांचे स्थानांतरण झाल्यानंतर त्यांच्या जागी सुनील बागल यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी नुकताच मुलचेरा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. गडचिरोली पोलीस दलातील C-60 या विशेष पथकाचा अनुभव असलेल्या सुनील बागल यांच्यासमोर मुलचेरा तालुक्यात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे महत्त्वाचे आव्हान असणार आहे.
मुलचेरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तब्बल 42 गावांचा समावेश आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, गुन्हेगारीला आळा घालणे तसेच नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण करणे तसेच गडचिरोली पोलीस दलाकडून नागरिकांच्या सुरक्षेसोबतच जनजागृती, ग्रामभेटी, पोलीस-पाटील व नागरिकांशी संवाद, व्यसनमुक्ती, युवकांशी संवाद, महिला व बालसुरक्षा तसेच विविध जनजागृती उपक्रम राबविले जातात. हे उपक्रम प्रभावीपणे ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही नव्या ठाणेदारांच्या खांद्यावर असणार आहे.एवढेच नव्हेतर मुलचेरा पोलीस ठाण्यात दररोज सकाळी राष्ट्रगीताचा उपक्रम राबविला जातो. शिस्त, देशभक्ती आणि पोलिसांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणारा हा उपक्रम नियमितपणे सुरू ठेवण्यावरही त्यांचा भर राहणार आहे.
दरम्यान, पदभार स्वीकारताच सुनील बागल यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच पोलीस पाटलांचीही बैठक घेऊन परिसरातील परिस्थिती, गावपातळीवरील समस्या आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले. गावागावातील घडामोडींची माहिती पोलिसांपर्यंत वेळेत पोहोचावी आणि पोलिस व नागरिकांमधील समन्वय अधिक मजबूत व्हावा, यासाठी पोलीस पाटील यंत्रणेचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.
सुनील बागल यांनी गडचिरोली पोलीस दलातील अत्यंत महत्त्वाच्या C-60 पथकात जवळपास पाच वर्षे काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, दुर्गम भागातील आव्हाने आणि स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा त्यांना चांगला अनुभव आहे. हा अनुभव मुलचेरा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि पोलिस-नागरिकांमधील विश्वास अधिक मजबूत करण्याचे आव्हान आता सुनील बागल यांच्यासमोर आहे. त्यांच्या नेतृत्वात मुलचेरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शांतता आणि सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.













