गडचिरोली: धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या ११ वर्षीय दीपिका बिलकुरासाय मडावी हिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी तातडीने नागपूरला एअरलिफ्ट करण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाच्या तत्परतेमुळे हेलिकॉप्टरची व्यवस्था करून दीपिकाला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दीपिकावर गडचिरोली येथे उपचार सुरू होते. मात्र, तिच्या प्रकृतीचा विचार करता अधिक प्रगत उपचारांची आवश्यकता असल्याने तिला नागपूर येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली करत पोलीस विभागाच्या समन्वयातून हेलिकॉप्टरची व्यवस्था केली.
वेळ न दवडता दीपिकाला एअरलिफ्ट करून नागपूरला पोहोचविण्यात आले. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिच्यावर पुढील उपचार सुरू करण्यात आले असून, वैद्यकीय पथक तिच्या प्रकृतीवर विशेष लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, दीपिकाला आवश्यक असलेले उपचार कोणत्याही विलंबाविना मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने नागपूर येथील वैद्यकीय यंत्रणेशी समन्वय साधला आहे. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे गंभीर अवस्थेतील दीपिकेला वेळेत पुढील उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.













