अहेरी : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ८८ व्या स्थापना दिनानिमित्त ३७ व्या बटालियनतर्फे सोमवारी (दि. २७) देशभक्ती, शिस्त आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणारे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर क्वार्टर गार्ड येथे नव्या ध्वजाचे विधिवत ध्वजारोहण करण्यात आले. बलाच्या शौर्य, त्याग, शिस्त आणि अखंड ऐक्याचे प्रतीक असलेला हा ध्वज अभिमानाने फडकताच संपूर्ण परिसर देशभक्तीच्या उत्साहाने भारावून गेला.
सीआरपीएफची स्थापना २७ जुलै १९३९ रोजी मध्य प्रदेशातील नीमच येथे क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलिस (CRP) या नावाने झाली. स्वातंत्र्यानंतर १९४९ मध्ये या दलाला केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) हे नाव देण्यात आले. देशांतर्गत सुरक्षा, नक्षलविरोधी मोहिमा, दहशतवादविरोधी कारवाया तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात सीआरपीएफचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. “सेवा आणि निष्ठा” हे ब्रीदवाक्य प्रत्येक जवानाला राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
हा कार्यक्रम कमांडंट (AOL) श्री श्रीमन नारायण पाटक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी उपकमांडंट श्री चंचल परवाना, उपकमांडंट श्री अनिल चंद्रमोरे तसेच वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वरुण मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थितांना संबोधित करताना अधिकाऱ्यांनी सीआरपीएफच्या ८८ वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेत जवानांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेतील अतुलनीय योगदानाचे कौतुक केले. तसेच सर्व अधिकारी, जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी पोलीस पदक (PMG) प्राप्त शूर जवानांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या पराक्रमाच्या कथा उपस्थितांसमोर मांडण्यात आल्या. त्यामुळे जवानांमध्ये राष्ट्रसेवेची प्रेरणा आणि समर्पणाची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
कार्यक्रमादरम्यान अधिकारी, जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना कर्तव्यनिष्ठा, शिस्त, संघभावना आणि राष्ट्रसेवेची मूल्ये जपण्याचे आवाहन करण्यात आले. शेवटी मिठाई वाटप करून उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.













