गडचिरोली:दुर्गम, आदिवासीबहुल आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याने आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत राज्यभरात आपली वेगळी छाप उमटवली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) राज्यस्तरीय मूल्यांकनात जिल्ह्यातील ११ आरोग्य संस्थांनी राज्यस्तरीय मानांकन प्राप्त करत ऐतिहासिक यश मिळविले आहे. यामध्ये अहेरी उपजिल्हा रुग्णालय, धानोरा ग्रामीण रुग्णालय आणि ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश असून, आता या सर्व संस्था राष्ट्रीय मानांकनासाठी सज्ज झाल्या आहेत.
राज्य कौटुंबिक कल्याण ब्युरो, पुणे यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार या यशामुळे गडचिरोलीतील आरोग्य सेवांचा दर्जा राज्यस्तरावर अधोरेखित झाला आहे. संसर्ग नियंत्रण, स्वच्छता, रुग्णाभिमुख सेवा, निदान सुविधा, गुणवत्ता व्यवस्थापन आणि रुग्ण समाधान अशा विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याने हे मानांकन मिळविले.
या यशाबद्दल जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, “दुर्गम भागातही दर्जेदार आरोग्य सेवा देण्याची क्षमता गडचिरोलीने सिद्ध केली असून, आता राष्ट्रीय मानांकन मिळविण्यासाठीही याच जिद्दीने प्रयत्न करावेत,” असे आवाहन केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनीही या यशामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आत्मविश्वास वाढल्याचे सांगत, भविष्यात सर्व आरोग्य संस्थांना NQAS प्रक्रियेत सहभागी करून गुणवत्तेचा स्तर आणखी उंचावण्याचा निर्धार व्यक्त केला.
गडचिरोलीसारख्या जंगलव्याप्त आणि दुर्गम जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीतही वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका आणि इतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या समर्पित सेवेमुळे हे यश शक्य झाले. त्यांच्या अथक परिश्रमांची ही राज्यस्तरीय पावती मानली जात आहे.
उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळाले असून, पुढील टप्प्यात सर्व ११ संस्था केंद्र शासनाच्या राष्ट्रीय NQAS मानांकनासाठी अर्ज करणार आहेत. राष्ट्रीय मानांकन मिळाल्यास केंद्र शासनाकडून विशेष प्रोत्साहन निधी उपलब्ध होणार असून, त्याद्वारे रुग्णाभिमुख सुविधा आणखी सक्षम केल्या जाणार आहेत.













