गडचिरोली: जिल्ह्यात सोमवारी (दि. २१ जुलै) पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावत अनेक भागांना चांगलेच झोडपून काढले. जिल्ह्यातील ४५ पैकी ४३ महसूल मंडळांमध्ये सरासरी ३२.० मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक सरासरी ७२.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचा तालुका ठरला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २८४.१ मिमी पाऊस झाला असून, तो अपेक्षित सरासरीच्या ५६.७ टक्के इतका आहे. त्यामुळे जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद होत असली तरी अनेक भागांमध्ये अजूनही सरासरी गाठायची आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील ८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामध्ये पेंटीपाका मंडळात १००.४ मिमी तर सिरोंचा मंडळात १००.० मिमी पाऊस झाला असून, या दोन्ही मंडळांमध्ये सर्वाधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे.सततच्या पावसामुळे नदी-नाले, ओढे आणि लहान जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.













