अहेरी : आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (क्र. 353-सी) वरील संकट अधिकच गडद होत चालले आहे. रेपणपल्लीजवळ तात्पुरता वळण रस्ता वाहून गेल्यानंतर आता गोविंदगावजवळही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शेकडो प्रवासी रस्त्यात अडकून पडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे तात्पुरत्या वळण मार्गाचे नुकसान झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या संबंधित यंत्रणेकडून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी नवीन वळण मार्ग तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, तोपर्यंत वाहनचालक आणि प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
सकाळपासून प्रवासाला निघालेल्या अनेक प्रवाशांचा अजूनही प्रवास पूर्ण झालेला नाही. एसटी बस, खासगी वाहने, मालवाहतूक वाहने आणि दुचाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांचा खोळंबा झाला असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने दर पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. तात्पुरत्या वळण मार्गांवर अवलंबून असलेली वाहतूक पावसाच्या प्रत्येक जोरदार सरीत ठप्प होत असल्याने नागरिकांकडून कायमस्वरूपी आणि सुरक्षित पर्यायी व्यवस्था उभारण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.













