अहेरी:गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलापल्लीत मोकाट जनावरांचा अक्षरशः हैदोस सुरू असून, ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. वीर बाबुराव शेडमाके मुख्य चौकासह शहरातील प्रमुख मार्गांवर दिवसभर जनावरांचा वावर दिसून येत असून, वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
आलापल्ली हे एटापल्ली, भामरागड, सिरोंचा आणि मुलचेरा तालुक्यांना जोडणारे महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, महिला आणि प्रवासी ये-जा करतात. अशा ठिकाणी भररस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेकदा जनावरांच्या झुंजी, अचानक रस्त्यावर धावणे आणि वाहनांसमोर येणे यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या दिवशी ही परिस्थिती अधिकच गंभीर बनते. बाजारपेठेत मोठी गर्दी, अवैध पार्किंग आणि त्यात मोकाट जनावरांचा मुक्त संचार यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होत असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.आश्चर्याची बाब म्हणजे ही समस्या एक-दोन दिवसांची नसून अनेक वर्षांपासून कायम आहे. तरीही ग्रामपंचायत प्रशासनाकडून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. एखादा गंभीर अपघात होऊन निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून शहरातील वाहतूक सुरक्षित करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
पशुपालकांनाही जबाबदारीची जाणीव आवश्यक
मोकाट जनावरांच्या समस्येसाठी केवळ प्रशासनालाच जबाबदार धरून चालणार नाही. पशुपालकांनीही आपल्या पाळीव जनावरांना रस्त्यावर मोकाट सोडण्याचे टाळावे. जनावरे सुरक्षित गोठ्यात ठेवून त्यांची योग्य देखभाल करणे ही प्रत्येक पशुपालकाची सामाजिक जबाबदारी आहे. कारण एका निष्काळजीपणामुळे एखाद्या निरपराध नागरिकाचा जीव धोक्यात येऊ शकतो. प्रशासन आणि पशुपालक या दोघांनीही जबाबदारीने वागल्यासच या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो.













