गडचिरोली: देशाच्या प्रथम नागरिकांकडून थेट प्रेरणा मिळण्याचा अविस्मरणीय क्षण गडचिरोली जिल्ह्यातील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आला. भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात विद्यार्थ्यांचे अत्यंत आत्मीयतेने स्वागत करत, “मोठी स्वप्ने पाहा आणि ती शिक्षणाच्या बळावर पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत करा,” असा प्रेरणादायी संदेश दिला.
जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत आयोजित दिल्ली शैक्षणिक सहलीत गडचिरोली, अहेरी आणि भामरागड येथील शासकीय आश्रमशाळांमधील ९६ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. राष्ट्रपती भवनात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रपतींनी हसतमुखाने स्वागत केले. विद्यार्थ्यांना चॉकलेट देत त्यांनी नाव, गाव, शिक्षण, आवडी-निवडी आणि भविष्यातील ध्येय याबाबत आत्मीयतेने संवाद साधला. राष्ट्रपतींसोबतचा हा स्नेहपूर्ण संवाद विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी अमूल्य आठवण ठरला.
संवादादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील पोटेगाव येथील एका विद्यार्थ्याने “मी भविष्यात शिक्षक बनणार आहे,” अशी इच्छा व्यक्त केली. विद्यार्थ्याचे ध्येय ऐकून राष्ट्रपतींनी त्याचे कौतुक करत शिक्षणात सातत्य, कठोर परिश्रम आणि चिकाटी ठेवण्याचा सल्ला दिला. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य, आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पाहण्याची उमेद निर्माण झाली.
राष्ट्रपती भवनाची ऐतिहासिक सफर
संवादानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक दालने, भव्य वास्तू, सभागृहे आणि परिसराची विशेष सफर घडविण्यात आली. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक संस्थेचे कार्य, राष्ट्रपती भवनाचा समृद्ध इतिहास आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेची माहिती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेतली. राष्ट्रपती भवन प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराचीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
राष्ट्रीय वारसा आणि ज्ञानाचा अनोखा अनुभव
दिल्ली शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थी संसद भवन, पंतप्रधान संग्रहालय, राष्ट्रीय विज्ञान केंद्र, आयआयटी दिल्ली, जंतरमंतर, राजघाट, लाल किल्ला, कुतुबमिनार तसेच राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट देत आहेत. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान, देशाचा सांस्कृतिक वारसा आणि उच्च शिक्षणाच्या संधींचा व्यापक परिचय होत असून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी ही सहल प्रेरणादायी ठरत आहे.













