गडचिरोली:जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या विशेष ‘ऑपरेशन ऑल आऊट’ आणि कोंबिंग ऑपरेशन अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. गडचिरोली, आरमोरी आणि चामोर्शी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या या मोहिमेत अवैध दारूविरोधात १३ कारवाया करत तब्बल ५ लाख ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात २४ जून रोजी सायंकाळी ५ ते ११ या वेळेत ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान विविध ठिकाणी धाड टाकून अवैधरित्या साठवून ठेवलेली दारू जप्त करण्यात आली.
याशिवाय, १३९ सराईत व अभिलेखावरील गुन्हेगारांची पडताळणी, हॉटेल्स, लॉजेस आणि निर्जन स्थळांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान ३०० वाहनांची तपासणी करण्यात आली असून ४० वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
या मोहिमेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट झाली आहे. “अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात अशाच विशेष मोहिमा भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील,” असे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले.













