गडचिरोली : शालेय शिक्षण विभागाच्या ‘चला शाळेला जाऊ या’ या उपक्रमांतर्गत शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर या २२ व २३ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा आणि मुलचेरा या पाच तालुक्यांतील शाळांना भेटी देऊन तेथील शैक्षणिक स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे.
जिल्हा परिषद गडचिरोलीच्या शिक्षण विभागाने २१ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, २२ सप्टेंबर रोजी विविध शाळांना भेटी देण्यात येणार असून, २३ सप्टेंबर रोजी शैक्षणिक आढावा सभा आयोजित करण्यात आली आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.
अहेरीत होणार दिवसभर शैक्षणिक आढावा
२३ सप्टेंबर रोजी अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील सेंट फ्रान्सिस इंग्लिश मीडियम स्कूल, नागेपल्ली (आलापल्ली) येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शैक्षणिक आढावा सभा होणार आहे. या बैठकीत संबंधित पाच तालुक्यांतील शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.शाळांची शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, विविध शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी, शाळांमधील उपलब्ध सुविधा तसेच दुर्गम भागातील शाळांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक तसेच विविध माध्यमांच्या शाळांमधील संबंधित शिक्षकांनी उपस्थित राहणे अपेक्षित असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांची मालिका
गडचिरोली जिल्ह्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी अलीकडच्या काळात वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांच्या व मंत्र्यांच्या दौऱ्यांना वेग आला आहे. ८ सप्टेंबर रोजी शिक्षण आयुक्त सचिन रताप सिंग यांनी जिल्ह्याला भेट देऊन शाळांची पाहणी केली, तर १० सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही गडचिरोली दौऱ्यात शाळांना भेटी देत शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेतला.
आता २२ व २३ सप्टेंबर रोजी शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांच्या दौऱ्यामुळे ‘चला शाळेला जाऊ या’ उपक्रमाला आणखी चालना मिळणार आहे. विशेषतः जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील शाळांमधील प्रत्यक्ष परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह पायाभूत सुविधांची स्थिती याकडे या दौऱ्यात लक्ष जाण्याची शक्यता आहे.
अभिजित दिपके यांच्या शाळा भेटीनंतर दौऱ्याकडे लक्ष
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नुकताच एटापल्ली आणि भामरागड तालुक्यांतील काही शाळांना भेटी देऊन तेथील पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले होते. दुर्गम भागातील शाळांमध्ये भेडसावणाऱ्या विविध समस्या त्यांनी समोर आणल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांचा पाच तालुक्यांतील शाळांचा प्रत्यक्ष आढावा महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात शाळांमधील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी होऊन स्थानिक पातळीवरील समस्या आणि शैक्षणिक अडचणी वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यात कोणत्या बाबींवर विशेष भर दिला जातो आणि आढावा बैठकीत कोणते निर्देश दिले जातात, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.











