गडचिरोली: कोरची तालुक्यातील बेडगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत आंतरराज्य सीमेलगत गहाणेगाठा जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत ३१ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण ३७ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी २२ चारचाकी, ६ दुचाकी, २६ मोबाईल फोन, ७५ हजार १० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य, असा तब्बल १ कोटी ३४ लाख १४ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय व जुगारावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर बेडगाव पोलिसांनी ही कारवाई केली. १८ सप्टेंबर रोजी गहाणेगाठा जंगल परिसरात काही जण ताशांच्या पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोउपनि. दिनेश खोटेले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने दोन पंचांसह जंगल परिसरात धाड टाकली. त्यावेळी ५२ ताशांच्या पत्त्यांच्या सहाय्याने पैशांची बाजी लावून जुगार खेळला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कारवाई करत २९ जुगाऱ्यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले, तर पुढील कारवाईदरम्यान एकूण ३१ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून रोख रक्कम, वाहने, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात अप. क्र. ०१३३/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनास्थळावरून पसार झालेल्या सोनू कांबळे, इम्रान शेख, बबलू खाटीक, रोहित साहू, बसंत सोनी आणि अबुल वर्मा या सहा आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. जुगाराचे आयोजन कोणी केले, यासह या प्रकरणातील इतर बाबींचा तपास पोउपनि. दिनेश खोटेले करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे आणि कोरचीचे पोनि. दिपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली बेडगाव पोलीस मदत केंद्राच्या पथकाने केली.












