अहेरी : अनेक वर्षांपासून रखडलेल्या आष्टी–सिरोंचा (राष्ट्रीय महामार्ग 353-सी) रस्त्याच्या कामाचा फटका यंदाही नागरिकांना बसू लागला आहे. पावसाळ्याच्या पहिल्याच दमदार सरीने आलापल्ली–सिरोंचा मार्गावरील अनेक तात्पुरते रपटे वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
सुमारे 145 किलोमीटर लांबीच्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील चार-पाच वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार तंबी देऊनही काम पूर्णत्वास येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नुकतेच सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनीही कामाच्या संथ गतीवरून कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणांची कानउघाडणी केली होती. मात्र त्यानंतर अवघ्या एका दिवसात पहिल्याच पावसाने रस्त्यावरील व्यवस्थेचे पितळ उघडे पाडले.
शुक्रवारी (19 जून) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसानंतर गुंडेरा नाल्यावरील रपटा वाहून गेला. याशिवाय आलापल्ली–सिरोंचा मार्गावरील अनेक ठिकाणचे तात्पुरते रपटेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी शेकडो गावांतील नागरिकांचा संपर्क धोक्यात आला असून आपत्कालीन परिस्थितीतही प्रवास करणे कठीण झाले आहे.
आलापल्ली ते सिरोंचा दरम्यानच्या शेकडो गावांतील नागरिकांना शासकीय कामांसाठी, आरोग्य सेवांसाठी तसेच शिक्षणासाठी याच महामार्गाचा आधार घ्यावा लागतो. विशेषतः रुग्ण, गरोदर माता आणि आपत्कालीन सेवांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशीच अवस्था होत असून नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे.
ऐन पावसाळ्यात पुलांची कामे; नियोजनावर प्रश्नचिन्ह

नागरिकांचे हाल सुरू असतानाच अनेक ठिकाणी पुलांच्या बांधकामाला ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेले तात्पुरते रपटे पहिल्याच पावसात वाहून गेले. पावसाळ्यानंतर ही कामे हाती घेण्याऐवजी पावसाच्या उंबरठ्यावरच कामे सुरू केल्याने संबंधित कंत्राटदारांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांचा सवाल – महामार्ग पूर्ण होणार तरी कधी?

दरवर्षी आश्वासने, बैठका आणि तंबी यापलीकडे काहीच होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दक्षिण गडचिरोलीसाठी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 353-सी चे काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे.













