गडचिरोली:जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात मध्यरात्री घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाजूलाच खाटेवर झोपलेल्या तरुणाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी मरपल्ली पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेतले आहे.मृतकाचे नाव महेश सत्यण्णा ओडिला (२८), रा. कर्जी, ता. दायगाम, जि. कोमरमभीम (तेलंगणा) असे असून आरोपी लक्ष्मण सोमा आलाम (५५), रा. करंचा, ता. अहेरी, जि. गडचिरोली याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, महेश ओडिला आणि त्याचा मित्र राजेश लचण्णा चापिला हे १८ जून रोजी तेलंगणातून करंचा येथे आले होते. लगतच्या येनकाबंडा गावात तेरावीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर ते रात्री करंचा येथे लक्ष्मण आलाम यांच्या घरी मुक्कामासाठी थांबले.रात्री तिघेही स्वतंत्र खाटांवर झोपले होते. मात्र, १९ जूनच्या मध्यरात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास आरोपी लक्ष्मण आलाम याने गाढ झोपेत असलेल्या महेशच्या डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यात महेशचा जागीच मृत्यू झाला.
एकाच हाताने केला जीवघेणा हल्ला
या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे आरोपी लक्ष्मण आलाम याला केवळ एकच हात आहे. असे असतानाही त्याने झोपेत असलेल्या महेशवर कुऱ्हाडीने वार करून त्याचा जीव घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिसांची तत्काळ कारवाई
घटनेनंतर महेशसोबत असलेल्या राजेश लचण्णा चापिला यांनी मरपल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवत आरोपीला ताब्यात घेतले.
घटनास्थळी फॉरेन्सिक पथकासह जिमलगट्टा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मडावी यांनी भेट देऊन पाहणी केली. हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाडही पोलिसांनी जप्त केली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे करण्यात आले.
आर्थिक व्यवहारातून वाद?
दरम्यान, मृतक महेश ओडिला आणि आरोपी लक्ष्मण आलाम यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून वाद असल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच महेश हा या परिसरातून तेलंगणात सागवान लाकडाची अवैध वाहतूक करत असल्याची चर्चा असून त्यासंदर्भातही पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत.
१८ जून रोजी दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि त्यातूनच हत्येची घटना घडली का, याचा उलगडा आता पोलिस तपासातून होणार आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली मरपल्लीचे प्रभारी अधिकारी आकाश शिंदे करीत आहेत.













