गडचिरोली: लगतच्या छत्तीसगड कॅडरचे २००३ बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी पी. सुंदरराज यांची राष्ट्रीय तपास संस्था (NIA) मध्ये इन्स्पेक्टर जनरल (IG) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने त्यांच्या नियुक्तीला मंजुरी देत देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे.
तमिळनाडूतील कोयंबतूर येथे २७ फेब्रुवारी १९८० रोजी जन्मलेल्या पी. सुंदरराज यांनी बी.एस्सी. (कृषी) शिक्षण पूर्ण केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण करत २००३ मध्ये भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला. त्यांना छत्तीसगड कॅडर मिळाले आणि त्यानंतरचा त्यांचा बहुतांश सेवाकाळ नक्षलग्रस्त भागात गेला.
विशेषतः बस्तर विभागात पोलीस महानिरीक्षक (IG) म्हणून कार्यरत असताना त्यांनी नक्षलविरोधी मोहिमांना नवे बळ दिले. सुरक्षा दल आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय साधत अनेक यशस्वी कारवाया राबविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक नक्षलविरोधी अभियानांना यश मिळाले असून दुर्गम भागात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यात ते यशस्वी ठरले.
पी. सुंदरराज यांची ओळख केवळ कठोर पोलीस अधिकारी म्हणूनच नाही, तर धोरणात्मक नियोजन, प्रभावी नेतृत्व आणि तळागाळातील परिस्थितीची सखोल जाण असलेले अधिकारी म्हणूनही आहे. नक्षलग्रस्त भागातील जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी विविध लोकाभिमुख उपक्रम राबविले.
राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवादविरोधी तपास आणि देशविरोधी कारवायांच्या चौकशीसाठी ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेत (NIA) आयजी पदावर झालेली त्यांची नियुक्ती ही छत्तीसगड पोलिस दलासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे छत्तीसगडसह नक्षलग्रस्त भागात कार्यरत पोलीस अधिकाऱ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून, राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा देशाला होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.













