अहेरी: केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बटालियन-९ चा ६७ वा स्थापना दिन मंगळवारी (१६ जून) रोजी अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. कमांडंट शंभू कुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक व शिस्तबद्ध परेडने झाली. बटालियनच्या जवानांनी उत्कृष्ट संचलन सादर करून आपल्या प्रशिक्षण, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडविले. कमांडंट शंभू कुमार यांनी परेडची सलामी स्वीकारत जवानांच्या पराक्रमाचे आणि समर्पणाचे कौतुक केले.
यानंतर आयोजित विशेष सैनिक संमेलनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मेडल, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. गेल्या वर्षभरात विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जवानांसह तांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना कमांडंट शंभू कुमार म्हणाले, “बटालियनची गौरवशाली परंपरा कायम राखण्यासाठी शिस्त, समर्पण आणि धैर्य या मूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी आपण कटिबद्ध असून राष्ट्रसेवेसाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे.” त्यांनी शहीद जवानांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी सर्व अधिकारी व जवानांनी देशाचे आणि संविधानाचे रक्षण करण्याची सामूहिक शपथ घेतली. यावेळी परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला. शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती व्यक्त करण्यात आलेला आदर आणि जवानांच्या समर्पणामुळे हा स्थापना दिन सोहळा अधिक संस्मरणीय ठरला.
महासंचालकांकडून शुभेच्छा व कौतुक
सीआरपीएफचे महासंचालक (डीजी) जी. पी. सिंग, आयपीएस यांनी बटालियन-९ च्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त कमांडंट, अधिकारी आणि जवानांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या बटालियनच्या १४ वीर शहीदांना आदरांजली वाहिली. तसेच बटालियनने सेक्टरमधील सर्वोत्तम प्रशासकीय ट्रॉफी पटकावल्याबद्दल आणि दक्षिण विभागाच्या स्वच्छता पखवाड्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल विशेष कौतुक केले. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद निर्मूलनासाठी बटालियनने बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेचाही त्यांनी गौरव केला.













