अहेरी:केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ९ व्या बटालियनचा ६७ वा स्थापना दिवस प्राणहिता पोलीस उप मुख्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्त १२ ते १६ जून २०२६ या कालावधीत विविध सांस्कृतिक, क्रीडा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून १४ जून रोजी बटालियन परिसरात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात जवानांचे कुटुंबीय, महिला आणि लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तथा ९ व्या बटालियनचे कमांडंट शंभू कुमार यांच्या अर्धांगिनी श्रीमती स्मृती प्रकाश यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर त्यांनी विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना भेट देत सहभागींच्या कल्पकतेचे आणि कौशल्याचे कौतुक केले.
मेळाव्यात रांगोळी स्पर्धा, ‘तुमची सुप्त कला दाखवा’, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, मुलांसाठी रिंग बँक यांसारख्या आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली.
याशिवाय तांबोळा, लिंबू शर्यत, मटकी फोड तसेच विविध क्रीडा आणि मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये महिला, मुले आणि जवानांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे संपूर्ण परिसर आनंद, उत्साह आणि जल्लोषाने भरून गेला.रंगीबेरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी मेळाव्याला विशेष आकर्षण प्राप्त करून दिले. गाणी, नृत्य आणि विविध कलाविष्कारांच्या सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.विशेष म्हणजे जवानांच्या कुटुंबांमध्ये परस्पर सलोखा, एकात्मता आणि कौटुंबिक बंध दृढ करणे हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली. आपल्या मनोगतात श्रीमती स्मृती प्रकाश यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन करत अशा कार्यक्रमांमुळे कुटुंबांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होऊन एकोप्याला बळ मिळते, असे सांगितले.
यावेळी ९ व्या बटालियनचे कमांडंट शंभू कुमार, वरिष्ठ अधिकारी, अधीनस्थ अधिकारी आणि जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्साही सहभाग आणि यशस्वी आयोजनामुळे हा मेळावा संस्मरणीय ठरला असून, त्यातून सीआरपीएफ कुटुंबांमधील एकता, सहकार्य आणि कौटुंबिक मूल्यांना अधिक बळकटी मिळाल्याचे दिसून आले.













