भामरागड :- अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्याच्या विकासासाठी सक्षम आणि निर्णयक्षम प्रशासनाची आवश्यकता असताना, अनेक अधिकारी येथे नियुक्ती टाळत असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली आहे. अशा परिस्थितीत पंचायत समिती भामरागडच्या गट विकास अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार महेश वाढई यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
भामरागड पंचायत समितीत स्वप्नील मगदूम हे दीर्घकाळ पूर्णवेळ गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र, २५ जुलै २०२५ रोजी प्रशासकीय बदली प्रक्रियेत त्यांची बदली झाल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर गडचिरोली जिल्हा परिषद येथील सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेंद्र गोंगले यांच्याकडे पंचायत समितीचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता. परंतु काही प्रशासकीय कारणास्तव त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ पदस्थापनेवर पाठविण्यात आले.
यानंतर ४ मार्च २०२६ रोजी पंचायत समिती धानोरा येथील सहाय्यक गट विकास अधिकारी शांतिरक्षक वानखेडे यांच्याकडे भामरागड पंचायत समितीचा प्रभार सोपविण्यात आला होता. दरम्यान, ११ मार्च २०२६ रोजी महेश वाढई यांनी पंचायत समिती भामरागड येथे सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर प्रशासनाने त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १३ मे २०२६ रोजी आदेश जारी करत महेश वाढई यांच्याकडे सहाय्यक गट विकास अधिकारी पदाचा कारभार सांभाळून गट विकास अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशापर्यंत सोपविला आहे. तसेच प्रशासकीय आणि वित्तीय अधिकारही त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.
मात्र, गेल्या दहा महिन्यांत तीन गट विकास अधिकारी बदलल्याने तालुक्याच्या विकासकामांवर परिणाम होत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे विकास प्रक्रियेला खीळ बसत असून भामरागडसारख्या संवेदनशील तालुक्यासाठी स्थिर आणि पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.













