मुलचेरा: प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना २०२५-२६ अंतर्गत सेंद्रिय शेतीला चालना देणे व प्रकल्प क्षेत्रातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बाधित गावांमध्ये रोजगार निर्मिती करणे या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी महत्वपूर्ण आव्हान केले आहे.
मुलचेरा तालुक्यातील अडंगेपल्ली, वेंगनूर, सुरगाव, पुल्लीगुडम, बोलेपल्ली व हेटलकसा या गावांतील आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी बचत गट, नोंदणीकृत शेतकरी महिला बचत गट, महिला बचत गट व नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ९५ टक्के अनुदानावर सेंद्रिय निविष्ठा योजना, गांडूळखत निर्मिती साहित्य व तत्सम निविष्ठा योजना तसेच आधुनिक औजारे बँक (मका औजारे बँक) योजनांसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
तालुका कृषी अधिकारी विकास पाटील म्हणाले, “या योजनांमुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल आणि स्थानिक रोजगार वाढेल. इच्छुक लाभार्थींनी तिन्ही योजनांसाठी वेगवेगळे अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मे २०२६ आहे. उशीर टाळून कार्यालयात संपर्क साधावा.” या योजनांमुळे स्थानिक शेतीला नवीन गती मिळेल व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.













